प्रेम जगती रीत का?

ओघळावी आसवे ही प्रेम जगती रीत का?
भावनांनी वेदनांचे जाणले मधुमीत का?

दु:ख विरहाचे कशाला? एकटा होतो कधी?
साथ असता वेदनांची आर्त हे संगीत का?

ताज लवकर का उभारू? प्रेम अजरामर तरी
सात बाकी जन्म असता मी पुरावी प्रीत का?

तो जरी बाहेरख्याली, दोष हा त्याचा नसे
नीळकमळी कैद भ्रमरा हीच त्याची जीत का?

तो नवाबी थाट, मुजरे, देवड्या आता कुठे?
पण कफल्लक, अत्तरांच्या राहती धुंदीत का?

मनसुबे माझे हजारो, चालता दमछाक पण,
काय क्षितिजापार वसते स्वप्न मम रंगीत का?

लोक होती खूप मोठे, दीपस्तंभासम कसे?
खर्चिले आयुष्य आम्ही भाकरी शोधीत का?

सत्त्यनारायण पुजेने इष्ट मंगल जीवनी
त्या दयळू दैवताला बांधले पोथीत का?

या जगी "निशिकांत" आहे, खूप पदरी बांधण्या
वेचले जे, ठेवले तू फाटक्या झोळीत का?

निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- दुवा क्र. १