आनंदण्याची कारणे

रेशमी नात्यात लपली काचण्याची कारणे
काय होती वेदना आनंदण्याची कारणे?

चांदण्या रात्रीत हाती हात असताना तुझा
शेकडो दिसली मला मी हरवण्याची कारणे

गीत गुणगुणतो कधी तर ताल मी धरतो कधी
तूच तर दिधली मला झंकारण्याची कारणे

व्हावयाचे तेच झाले बेवडा झालो अता
दर्पणी तू शोध माझ्या हरवण्याची कारणे

आज मज रडणे रडाया एकही खांदा नसे
कोण पुसतो? आज अश्रू गाळण्याची कारणे

धर्म, जती, पंथ नाना, घासती सांधे किती?
हरवली कोठे दुव्यांना सांधणारी कारणे?

काम झटपट मज कराया लाच पुरवी कारणे
अन्यथा देतोय कामे टाळण्याची कारणे

षंढ सारे वाकती का आज अन्यायापुढे ?
का निखारेही विसरली पेटण्याची कारणे?

का हवी कारण मिमांसा व्यर्थ तुज "निशिकांत"रे?
हासऱ्या पुसती कळ्या का उमलण्याची कारणे ?

निशिकांत देशपांडे मो.नं.-- ९८९०७ ९९०२३
E mail ;- दुवा क्र. १