नको भेट आता असूदे दुरावा
असा मी इरादा कितीदा करावा
पुरे दु:ख आता उगाळून पीणे
जरा थांब, प्याला कितीदा भरावा?
कवडसा नको आज अंधार दे तू
सुवर्णाठवांचा मिटूदे पुरावा
नको दु:ख आता नको प्रेम करणे
झरा वेदनांचा किती हा झरावा?
तुझा हात सुटल्या क्षणी डाव सरला
वृथा श्वास आता कशाला उरावा?
तिच्या निर्णयाने जगूद्या मुलीला
पिता सांगतो तो तिने का वरावा?
उभ्या डोंगराला पुरेसे खसूद्या
जरा गर्व, तोरा तयाचा हरावा
किती पानगळ ही! दिसे बोडखा तो
वसंतात हिरवा पुन्हा थरथरावा
भ्रमंतीत "निशिकांत" चुकल्यात वाटा
खरा मार्ग समजून आता धरावा
निशिकांत देशपांडे मों. नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- nishides1944@yahoo.com