जीवन अपुले

संगमरमरी स्वप्न असावे जीवन अपुले
श्रावणधारांचे शिडकावे जीवन अपुले

मिसळू, हरवू इतके आपण, दोघांपैकी
एक वगळता शुन्य उरावे जीवन अपुले

थरथरणाऱ्या पात्यावरच्या दवबिंदूसम
एक तरी क्षण मोती व्हावे जीवन अपुले

तुजविन मी अन मजविन तू हा प्रश्नच नाही
द्वंद्वगिताची चाल बनावे जीवन अपुले

हूल सुखांनी देणे कांही नवखे नाही
दु:खाच्या नक्षीत सजावे जीवन अपुले

ऊन जरासे झेलू आपण डोक्यावरती
वाटसरूंना छाव दिसावे जीवन अपुले

व्यर्थ मुखवटा लावून जगता काय मिळाले?
भूलभुलैय्या झूठ नसावे जीवन अपुले

संध्याछाया दारी येता दु:ख कशाचे?
निशिगंधाने गंधाळावे जीवन अपुले

रजनी सरली "निशिकांता" बघ पूर्व दिशेला
आनंदाने का न फुलावे जीवन अपुले?



निशिकांत देशपांडे  मों. नं.  ९८९०७ ९९०२३

        email:-- nishides1944@yahoo.com