काहुराने विझवलेला दीप कोणी लावला?
कृत्त्य हे तर गारद्यांचे नेम धरण्या चांगला
साधला मी स्वार्थ नाही आपुल्या परक्यासवे
फायदा पाहून जो तो मजसवे का वागला?
वारुळाला खोदले पण साप ना दिसला कुठे
शोध घेता खूप त्याचा अस्तिनीतच गावला
कोरडी आकाशगंगा थेंब पाण्याचा कुठे?
फक्त शोभा अंबराची पाहणारा भाळला
मेद रावांची समस्या, वेगळी रंकासही
वाळलेला जो अधीचा, तो अजूनच वाळला
किर्तनाचे, प्रवचनाचे पेव फुटले आज पण
भेटला मज एक नाही धर्म ज्याने पाळला
का विटेवर फेकलेल्या तो उभा आहे असा?
भक्तिरंगी रंगल्यांना तो कधी ना पावला
वाचल्या निवडून गजला, दाद श्रोत्यांची कशी !
वाहवा टाळ्या न देउन आरसा मज दावला
बस पुरे "निशिकांत" देणे पाप पुण्याचे धडे
देव आहे झोपला अन दैत्त्य आता जागला
निशिकांत देशपांडे मों. नं. ९८९०७ ९९०२३
E Mail:-- nishides1944@yahoo.com