शिस्त मी नव्या जगातली उगाच मोडतो
नेमके नको असेल तेच सत्य बोलतो
ज्या क्षणास मानतो तिमीर हाच सोबती
मागणे नसूनही उजेड कोण धाडतो?
सोडणे हिला तसे कठीण वाटते कुठे?
फक्त भार वाहते म्हणून गप्प राहतो
साधले मला कुठे समूळ तोडणे कुणा?
आजही कुणी जुनाट अल्बमात भेटतो
माय राबते मुलास आधुनिक करायला
पोरगा तिचे कुशल इमेलने विचारतो
-------
विजय दिनकर पाटील 'कणखर'