खूप घेतले मिळते जुळते ललकारावे अता जरासे
जीवना न मी तुझा मांडलिक ध्यान असावे अता जरासे
थुंकुन तुजवर आज निघालो घडी न येता अंत प्रवासी
क्रूर आयुष्या तुला कशाला गोंजारावे अता जरासे
किती डंख अन् किती वेदना! सोसत जगलो, मनी वाटते
अस्तिनीतल्या सापावरती फुत्कारावे अता जरासे
मला दिली अंधार कोठडी टूजी साठी, सुटेन पण मी
खूप जाणतो कसे कुणाला चुचकारावे अता जरासे
लाथ मारता हाड मोडले कसे निघावे पाणी येथे?
फाजिल विश्वासास आतल्या खोल पुरावे अता जरासे
तपास माझ्या भंग कराया जशी मेनका आली दारी
विचार केला पुरे तपस्या झंकारावे अता जरासे
गुंड जाहला ज्ञानी बाबा प्रवचानात पण जुनीच भाषा
"गडबड करणार्यांना काल्या! टपकावावे अता जरासे"
वळून मागे बघता कळले पदरी आहे पुण्य अल्पसे
किती पाप हे! भोग भोगुनी निस्तारावे अता जरासे
परीघ छोटा कधी नसावा वाढ खुंटते व्यास, त्रिजेची
यत्न करूनी क्षितिजालाही विस्तारावे अता जरासे
निशिकांत देशपांडे
मो.क्र. ९८९०७ ९९०२३