त्या युगाचे स्वप्न बघतो, सत्य जे होणार नाही

त्या युगाचे स्वप्न बघतो, सत्य जे होणार नाही
वाट त्याची पाहतो जो देव अवतरणार नाही

काय ग्लानी याहुनी बाकी असे धर्मास येणे?
झोपलेला शेषशायी का कधी उठणार नाही?

माजले सत्तांध कौरव, मातले कामांध रावण
लाज दुबळ्यांच्या घरांची राखली जाणार नाही

उंब‍र्‍यावर सांजकाळी पेंगती पाळीव बोके
एकही स्तंभातुनी का गर्जना घुमणार नाही?

'भृंग', वार्‍यावर जगाला सोडले परमेश्वराने
अन्‌ फण्यावर तोलुनी ते शेषही धरणार नाही