यारीत बाटलो मी (ज़ुल्काफ़िया ग़ज़ल)

परक्याच माणसांच्या वस्तीत वाढलो मी
एकांतवास ओझे ओढीत संपलो मी

असतो म्हणे महाली झगमग प्रकाश सारा
अंधार सोबतीला, पडवीत झोपलो मी

स्वप्नातही न दिसले जे जे मला हवे ते
सोडून आस डोळे चोळीत जागलो मी

मृगजळ पुढ्यातले ते हाती कधी न आले
शोकांतिकेत पहिल्या ओळीत शोभलो मी

अश्रूस ओघळाया गालावरी न जमले
अन् कैद पापण्यांची भोगीत साचलो मी

आली घृणा मलाही माझीच एवढी की
माझ्याकडून गेला वाळीत टाकलो मी

आनंदकंद* छंदी जगण्यास बंड केले
ग्रिष्मात श्रावणाच्या हद्दीत नाचलो मी

हरवून होश जगण्या मदिरा हवी कशाला?
डोळ्यातल्या नशेच्या धुंदीत झिगलो मी

अक्षम्य चूक झाली "निशिकांत"ला उमगले
तारा उगीच जुळल्या यारीत बाटलो मी

*ही गजल आनंदकंद व्रुत्तात आहे

निशिकांत देशपांडे  मो. क्र.  ९८९०७ ९९०२३