गावात पारव्यांच्या घुसली, पहा, गिधाडे
बळकावलीत त्यांनी घरटी, जमीन, पाडे
आम्हांस बोध कोठे होतो सुनावणीचा
भाषेत शोषकांच्या न्यायाधिशी निवाडे
जगणे असे कसे हे भरडून टाकणारे
झालीत माणसांची नीरस, सुकी चिपाडे
तक्रार काय करता जर बार बंद दिसला
शेतात पावसाविण दररोज कोरडा 'डे'
गोष्टीरुपात उरली मर्दानगी मराठी
तालात लावण्यांच्या गावे कसे पवाडे