माणुसकीचे शेत असावे. (ज़ुल्क़ाफिया ग़ज़ल)

 

स्वप्नामधल्या गावी माझ्या माणुसकीचे शेत असावे
बारा महिने सुगी असावी सौद्याविन मी देत रहावे

गाणी जात्यावरची कानी भल्या पहाटे गोड पडावी
बहिणाबाईच्या ओव्यातुन धडे रोज मी घेत उठावे

पंचायतही बसो न गावी दंडित करण्या चुकलेल्यांना
मार्ग दावुनी सुधारण्याचे सभासदांनी बेत करावे

चांगुलपणही जगी नांदते नकोच चर्चा दुष्कर्मांची
निवडुंगाच्या फुलण्याचेही देत कुणी संकेत फिरावे

मिश्रण आहे प्रपंच आणी परमार्थाचे जीवन येथे
पेरा होता लगेच दिंडी विठ्ठलास वाटेत स्मरावे

समाज मंदिर गाव बनावे, पारावरती करून चर्चा
संकटातही मार्ग निघावे कुणी कधी चिंतेत नसावे

कशास देता चितेस अग्नी? व्यर्थच जळतो लाकुड फाटा
झाड लावण्या हिरवे हिरवे "निशिकांता"चे प्रेत पुरावे.

निशिकांत देशपांडे  मो.क्र.  ९८९०७ ९९०२३
E Mail:  nishides1944@yahoo.com