बोलती माझ्यासवे ( तरही )

आज अंधारात दिसती आठवांचे काजवे
जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे

पापण्यातिल बंद स्वप्ने का सुकावी ही अशी?
पालवी फुटण्यास त्यावर शिंपडावी आसवे

सोनियाच्या गणपतीला चोरले पण शांत तो
देवही हतबल जरासा जाहल्यागत जाणवे

लाचखोरीची बघावी चांगली बाजू कधी (?)
काम करती लगबगीने कर्मचारी कासवे

मी शतायुष्यी असावे शाप का देता मला
कोणता परलोक नेतो दाखवा तो हायवे

जाळल्या डिग्र्या निकामी शिक्षणाच्या काल मी
नोकर्‍या बढत्या मिळाया आड येते जानवे

राज्यकर्त्यांनी बदलली मुल्यनीती एवढी
झूठ सजले वस्त्र लेवुन सत्त्य झाले नागवे

सोड तू "निशिकांत" आता स्पष्टवक्तेपण जरा
स्वर्थ असता गुंतलेला गा तयांचे गोडवे

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com