सांगते हे जग

सांगते हे जग मला की मी कसा
मी कशाला विकत घेऊ आरसा?

मी सु़खी, माझी सुखाची आसवे
जग म्हणे 'हा हसत नाही फारसा'

ते चमकणारे दिवे विझले तरी
पाळला मी तेवण्याचा वारसा

मोक्ष साऱ्या प्रार्थनांची मागणी
अन् मला कां जन्मण्याची लालसा?

का अता अंधारले जग हे असे?
आणि माझ्या अंगणी ये कवडसा

तारका बघती मला अन् लाजती
देखणा वाटे मला हा भरवसा

---------------------------- जयन्ता५२