सुप्तनाते
तुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना
कुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना
तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा
मला कुस्करावेस मर्जीप्रमाणे, शिरोधार्य आहे तुझी भावना
तुला जाण नाही, मला भान नाही, कसा चालणे सांग संसारगाढा
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, न पेक्षा बर्या मग खुल्या यातना
चला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ, हृदय भासते मेड इन चायना
किती ग्रंथ वाचून मुखपाठ केले, किती ऐकतो रोज पारायणे
जुमानेच नाही कशालाच थोडी, नियंत्रीत होईचना वासना
कसा आज रस्ता दिशाभूल झाला, निघाला कुठे अन् कुठे पोचला
कसोटीत उद्दिष्ट हरवून गेले, "अभय" व्यर्थ गेली तुझी साधना
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------