मनात काही चलबिचल होते

मनात काही चलबिचल होते
त्याचीच मग पुढे गझल होते

कोडे सत्याचे सुटत नाही
कधी न स्वप्नांची उकल होते

तुझ्या मी सोबतीने चालता
जगणे श्वासांची सहल होते

निष्कर्ष काढणे कुठे जमले
कळले ते नुसतेच कल होते

खऱ्याचे धैर्य देण्याऐवजी
शपथेस गिता, बायबल होते

हवा तो रंग वेळेला दिला
असे झब्बे शुभ्रधवल होते

तुझा उंबऱ्याला स्पर्श होता
झोपडीही ताजमहल होते

तुला वगळून मी लिहितो तरी
गझल नेमकी मुसलसल होते

--   अभिजीत दाते