जरा फुंकरावे

मनी कैक जखमा किती भळभळावे
मला मीच आता किती फुंकरावे

जिवा लागली वाळवी आपुल्यांची
मनीच्या नमीला कसे वाळवावे?

किती माळ ओसाड माझ्या मनाचा!
बिजाने खुषीच्या कसे अंकुरावे?

हुबेहुब जसा चेहरा, बिंब दावी
वृथा आरशावर कुणी का चिडावे?

तिचा अंत होतो जरी सागरी पण
नदीने प्रवाही न का खळखळावे?

जरी भाग्य अपुल्या हातात असते
तरी कुंडलीतील गुण का बघावे?

दुशाली न देती खरी ऊब आई!
कुशीला तुझ्या शांत वाटे निजावे

जरी जाहलो डोंगरा एवढा मी
दुरूनच मला साजरे का म्हणावे?

तिचे वेड "निशिकांत"ला एवढे की
तिला भेटण्या श्वास बाकी उरावे

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com