पावसा रे वाग की पाऊस असल्यासारखा
काय धिंगाणा तुझा माणूस असल्यासारखा
केवढा कल्लोळ माझ्या अंतरंगी नांदतो
वाटतो एकांतही धुडगूस असल्यासारखा
गच्च होतो आसवांनी, पेटतो अन शेवटी
देहसुद्धा वागतो कापूस असल्यासारखा
आज का इतका स्वतःला ओळखीचा वाटलो
आरसाही चेहऱ्याची फूस असल्यासारखा
पायरी पाहून होती लावली बोली जरी
भाव त्याला लागला हापूस असल्यासारखा
टाकली जेव्हा नव्याने जीवनाची कात मी
भेटला तो काळही मुंगूस असल्यासारखा
-- अभिजीत दाते