गझल
लागला गळफास तेव्हा तरतरी श्वासात आली!
पार मेली भूक तेव्हा भाकरी हातात आली!!
पोटपाण्याचा निघाला मामला अन् वाकलो मी;
ताठ केली मान तेव्हा नोकरी धोक्यात आली!
वाटल्या लाटा दयाळू, अन् किनाराही कृपाळू;
लागला पत्ता न केव्हा जिंदगी गोत्यात आली!
कोण जाणे हे कधीचे नाचते तारुण्य माझे?
समजण्या आधीच काही पैंजणे पायात आली!
स्वप्न बघण्याचा मलाही लागला इतका लळा की;
ती जरी साक्षात आली, वाटते स्वप्नात आली!
काय मी सांगू कशाने गोडवा गझलेत आला?
वेदनांनी दंश केला, माधुरी शब्दात आली!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१