देवो कुणीही काही दिलासा, रोगास माझ्या उपचार नाही!
ठाऊक आहे, हेही मला की, मी फार आता जगणार नाही!!
माझ्या उशाशी आयुष्य त्यांचे वर्षानुवर्षे जागेच आहे;
कालांतराने होईल सुटका माझी, असा हा आजार नाही!
अपरात्र झाली, आताच ये तू, येईल संगे, मृत्यू तुझ्या मी!
झोपेत आहे दुनिया, कुणाला काहीच आता कळणार नाही!!
यावा कवडसा अगदी तसा हा काळोख येतो हृदयात माझ्या;
तुम्हास माझ्या अस्वस्थतेचा अंदाज केव्हा येणार नाही!
भाळून झाले रूपावरीही, मोहून झाले रंगावरीही;
मी कोण आहे? जग काय आहे? कळते मला, मी फसणार नाही!
माझाच वारा, माझ्याच लाटा, माझी नदी अन् माझा किनारा!
मी ओघ आहे वेड्या अनादी, कोणामुळे मी थिजणार नाही!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१