जाता जाता

प्रवास आहे करावयाचा वर्षे मोजत जाता जाता
आणि दिवस सरपटतो, जातो.. अगदी सरकत जाता जाता

सांग मला हा ऋतू कोणता? सुवास माळुन फिरण्याचा?.. बघ
नुकते गेले आठवणींचे रान शहारत जाता जाता

त्या प्रश्नाने मान वळवली थोड्या नाजुक अपघाताने
उत्तर किंचितसे अडखळले संधी साधत जाता जाता

तुझा ऐकला नकार तेव्हा डोळे भरले..पण हसलोही
जेव्हा दिसली नाराजीही डोळा चुकवत जाता जाता

दिशाहीन हसणारा वेडा कधी एकटा रडायचाही
कुणा न कळले आयुष्याशी होता बोलत जाता जाता

सूर मांडते एक तिथी अन त्यामागे दडलेले काही
ठेवुन जाते जुळत्या ओळी आणि अलामत जाता जाता

जाता जाता वाटत आहे तव श्वासांना सुचवावेसे
"येते आता!" असे म्हणावे नजर सोडवत जाता जाता

सुटेल सोबत जमिनीची पण ना भीती कुठल्याच पुराची
निघेन घेवुन डोळ्यांवर स्वप्नांचे गलबत जाता जाता