इथे घडले काहीसे

अंगावर पसरले
मंद चांदण्यांचे साचे
मिटलेल्या डोळ्यांपाठी
काही आवाज रात्रीचे

मिटलेल्या डोळ्यांपाठी
किती अंधार सांडला
काळ्या साडीवर जणू
कुणी अंबाडा सोडला

खोडसाळ वाऱ्यामधे
फडफडतो पदर
विचारांचे ढग घेती
काही घोटीव आकार

चाचपडतो आरसा
एक नितळशी छाया
सूख इथेही एकदा
आले होते उभ्या उभ्या

थोडे दूर सरकले
मंद चांदण्यांचे साचे
दूर वाजले पाऊल
गंधाळल्या पहाटेचे

घाईघाईने जराशी
रात्र माघारी निघाली
कशी माझ्याच अंगणी
तिला पहाट भेटली

क्षणभर थबकल्या
हात हातात घेऊन
दोघींचाही निसटला
अर्धा अर्धा एक क्षण

दोन्ही क्षण आपसात
काही बोलले अस्फुट
इथे घडले काहीसे
सुरुवात वा शेवट

अर्धे भान काळोखात
अर्धी पहाटेची मिठी
नव्या अस्पर्श श्वासांना
जाग आली माझ्या ओठी