घरबसल्या संपर्क जगाशी साधत आहे!

घरबसल्या संपर्क जगाशी साधत आहे!
अंतर का माणसांतले मग, वाढत आहे?

ते पूर्वीचे पत्र कुठे अन् कुठे पोस्टमन?
वाट पाहणे, अधीर होणे संपत आहे!

नाव, गाव सारेच बनावट, फसवा फोटो.....
वरवरच्या शब्दांवर दुनिया डोलत  आहे!

ना ज्ञानाचा, वडीलकीचा आदर उरला....
पोर शेंबडे म्हाताऱ्याला शिकवत आहे!

रक्ताचे पाणी करुनी वाढवले ज्याला;
तोच पोरगा जाब पित्याला मागत आहे!

तारुण्याच्या धुंदीतच बापास बोललो!
तेच बोल मुलगाही मजला सुनवत आहे!!

गेलेला क्षण किंवा व्यक्ती काय परतते?
केव्हाचे मी हेच मला समजावत आहे!

देवाचा आवाज हरेकामध्ये असतो!
कुणी दाबतो तर कोणी तो ऐकत आहे!!

भीती आम्हाला कुठली, सरणावर जळण्याची?
हयातभर जिंदगी अम्हाला जाळत आहे!

अलीकडे मी कमीच केले पुस्तकवाचन!
आताशा चेहरे मानवी वाचत आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१