गझल
नाहीस तू तुझा पण, येथे सुवास आहे!
इतुकाच मज दिलासा जगण्यास बास आहे!!
चुकतात काळजाचे काही मधेच ठोके....
असशील तू निघाली, माझा कयास आहे!
मी घोट अमृताचे समजून सर्व प्यालो.....
पेल्यातही विषाच्या न्यारी मिठास आहे!
सुकणार ना कधीही गजरा तुला दिलेला....
गजऱ्यात गुंफिला मी एकेक श्वास आहे!
ही वेगळीच आहे फाशी मला दिलेली!
मी गीत गात आहे, मूर्च्छीत फास आहे!
राहू उभा कशाला दारात सावलीच्या?
आता असा कितीसा उरला प्रवास आहे?
नाकारता कसे ते अस्तित्व ईश्वराचे?
रेणू-अणूत इथल्या त्याचा निवास आहे!
प्रतिसाद कैक येती, पण, काय त्यांत आहे?
विद्वेष अन् टवाळी यांचाच वास आहे!
अस्ताचलास माझ्या उरलेत दिवस काही....
दुनिये! तुझी परंतू, भलती मिजास आहे!
बोलून टाक सारे, अन् मोकळा तरी हो!
तुझिया मनात जी जी दडली भडास आहे!!
सौंदर्य साधनांच्या कुबड्या तुला कशाला?
आहेस तू तसाही, सुंदर, झकास आहे!
हा चेहरा तुझा ना, ना देहही तुझा हा.....
घेतोस श्वास जो तू, त्याचा विलास आहे!
सुख हे चकाकणाऱ्या असते दवाप्रमाणे!
अस्तित्व फार मोठे कुठल्या दवास आहे?
पैसा नको प्रसिद्धी, सत्ता नको सुबत्ता!
तुझिया शिवाय जगणे अगदी भकास आहे!!
कित्येकदा असेही होते, मला न कळते....
मी नेमका कशाने झालो उदास आहे?
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१