गझल
जायचे होते मलाही रक्त माझे द्यायला!
पोसण्यासाठीच जळवा लागले थांबायला!!
जीवनाने एवढा मी जाहलो बेहोष की,
समजले नाही कधी मज काळ आला न्यायला!
‘सांग’ तू म्हटलेस म्हणुनी लागलो सांगायला.....
तोच का काळीज इतके लागले दडपायला?
बिनहिशोबी वागणे त्यांच्यासवे नाही बरे;
लोक हे येतील तुजला एकदिवशी खायला!
लावुनी वाटेकडे डोळे तिच्या बसलास तू....
त्या पहा त्या चांदण्याही लागल्या पेंगायला!
होय! मी केल्या चुका, ही वाचताना माणसे....
त्या चुकांमधुनीच मजला लागले समजायला!
मीच आहे धोंड मोठी त्यांचिया वाटेतली....
मोकळे मैदान त्यांना पाहिजे नाचायाला!
काल त्यांना मी गणंगासारखा वाटायचो;
दूर मी गेल्यावरी ते लागले शोधायला!
मी दगड होतो, विनाकारण न मूर्ती जाहलो!
घाव टाकीचे किती मज लागले सोसायला!!
देव आवळतोच नाड्या, योग्य आली वेळ की,
कोण आपण, माणसाला लागते समजायला!
मी बदलता विश्व आपोआप बदलू लागले!
भाग्यरेषाही अखेरी लागल्या बदलायला!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१