गझल
कोणतीही नोकरी घ्या, हाच शिष्टाचार आहे!
आज जो तो जाहला स्वायत्त नोकरदार आहे!!
लोकशाहीचा जमाना, पांगळे सरकार आहे!
लाख अध्यादेश काढा, कोण ताबेदार आहे?
माणसांच्या चेहऱ्यांची श्वापदे फिरतात येथे....
जंगलांपेक्षा अधिक शहरात हिंसाचार आहे!
एवढे त्यांना सलाया, मी तरी थांबू कशाला?
लादणे अस्तित्व सुद्धा एक अत्याचार आहे!
माझिया पिंडाप्रमाणे चालतो शिस्तीमधे मी!
या पिढीचे धावणे भलतेच बेदरकार आहे!
काय घोटाळे, किती लफडी, किती माया जमवली!
आज त्याच्या एवढा कोणी न अब्रूदार आहे!!
हौस असते वेगळी अन् ध्यास हा असतो निराळा!
कैकजण लिहितात गझला, कोण दर्जेदार आहे?
सावळा गोंधळ बघत असतील भटही खिन्नतेने!
आज गझलेचेच नकली पीक भारंभार आहे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१