रातराणी

.........................................
रातराणी
.........................................

मी नवीही; जुनी-पुराणी मी!
आदि-अंताविना कहाणी मी!

भेट झाली न मजसवे माझी...
थांबलो कोणत्या ठिकाणी मी?

मी खुळा-बावळा बरा आहे...
पाहिली माणसे शहाणी मी!

जी कधीही न गाइली गेली...
ज्ञानया, ती तुझी विराणी मी!

सांगता ही सुरेल स्वप्नाची...
संपलो गात गात गाणी मी!

हीच माझी समज हुशारी तू...
राहिलो जन्मभर अडाणी मी!

व्यर्थ येती भरून का डोळे?
घालतो वेदनेस पाणी मी!

मी रमेना कुणाकुणापाशी...
हा असा वेगळाच प्राणी मी!

भोगली गंधमत्त देहाची...
चांदण्यातील रातराणी मी!

- प्रदीप कुलकर्णी

.........................................

रचनाकाल ः 16 जानेवारी 2013

.........................................