चतुर्भुज होउनी आपापले अंगण मिळाले

चतुर्भुज होउनी आपापले अंगण मिळाले

कुणा घरपण मिळाले, तर कुणाला रण मिळाले

 
कशाला सोहळ्यांसाठी फुका पंचांग बघता?

करावे साजरे जे जे सुखाचे क्षण मिळाले

 
रिता पेला कधी दिसला न मधुबालेस माझा

भले नंतर तिच्या डोळ्यांतुनी तर्पण मिळाले

 
जरा उघडून डोळे माणसांना पाहिल्यावर

कधी प्राणी, कधी दानव, कधी सुरगण मिळाले

 
किनार्‍यावर जरी चालून गेल्या लाख लाटा

चढाईतून त्यांना फक्त वाळूकण मिळाले

 
निवडणुक पार पडली, लोकशाही तृप्त झाली

दरिद्र्यांना नवे नवकोट नारायण मिळाले

 
कवच बेकायद्याचे सत्यही भेदू न शकले

खुन्याला फौजदाराचेच संरक्षण मिळाले

 
तसा वर्षाव सर्वांच्या शिरी केला जगाने

कुणाला पाकळ्या कोमल, कुणाला घण मिळाले

 
निघाला 'भृंग' कवितेने समाजाला बदलण्या

बदलले हेच, बैलांना नवे वैरण मिळाले