गझल
अधीरता सोयऱ्यांतली, त्या कलेवराला दिसून आली!
कळायच्या आत पार त्याची चिता पहा बेचिराख झाली!!
अता कुठे रंग जीवनाचे जरा जरा लागलेत बदलू.....
अशात ही भैरवी सुचवते.....अरे तुझी सांगताच झाली!
टवाळखोरांस भोवतीच्या बघून होऊ कशास दु:खी?
कमळ कधी का करेल कुरबुर? किती चिखल हा सभोवताली!
मला स्मशानात पोचवाया किती दिशांतून लोक आले....
गढून गप्पांत सर्व गेले! कुणी न पुसली मला खुशाली!
करायला जे हवेच होते, करून ते मी कृतार्थ झालो!
तुझीच मर्जी, तुझीच दु:खे, तुझी मला बक्षिसी मिळाली!!
जरी न तू बोललीस काही, जरी चुकवलीस तू नजरही;
तुझ्या मनातील गूज सांगे तुझ्याच गालावरील लाली!
सबंध आयुष्य हे प्रसिद्धीविनाच चुपचाप काटले मी!
अशी कशी भव्य प्रेतयात्रा घरातुनी माझिया निघाली?
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे
फोन नंबर: ९८२२७८४९६१