आकाशवाणी मुंबईवर सकाळी सहा वाजताच्या दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या बातम्यांनंतर सकाळचा ‘मंगलप्रभात’ कार्यक्रम सुरू व्हायचा. तयार होताना घड्याळ बघायची गरज नव्हती लागत. कार्यक्रमांवरून किती वाजले ह्याचे भान राहायचे. सोबत छान गाणीही ऐकायला मिळायची.आज ब-याच वर्षांनी रेडिओवर ‘रात्र काळी, घागर काळी…’ गवळण ऐकायला मिळाली. लहानपणचे दिवस आठवले. पंधराव्या शतकात संत विष्णूदास ह्यांनी अनेक ग्रंथ, अभंग व कविता लिहिल्या. त्यांनी लिहिलेली ही गवळण लक्षवेधी आहे. रचना पंधराव्या शतकातील आहे. शब्द साधे असले तरी वापरात नसल्याने समजायला अवघड वाटतात. दत्ताराम गाडेकरांची सोपी पण आकर्षक चाल मनोवेधी आहे. आकाशवाणीचे कलाकार गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर व इतरांनी गायीलेले गाणे परत परत ऐकावेसे वाटते. गायिका कोण आहे समजत नाही. गवळणीचा अर्थ सूचक आहे. गवळणींचा हट्ट, कृष्णावरील भक्ती आणि श्रद्धा या गाण्याच्या शब्दांतून आणि चालींतून दिसून येते. प्रसंग काळोखातला आहे. काळी रात्र, घागर काळी, अंधारात यमुनेचे पाणी काळसर वाटते, घागर डोक्यावर ठेवायला घेतलेले चुंबळ काळेच. गळसोड तर काळे असतेच. हातातल्या बांगड्या काळसर गडद रंगाच्या, नेसलेले लुगडे व चोळीही काळी. गवळण स्वतःला काळी म्हणते व कृष्णाला सावळा हे भक्ती भावनेचे मूर्त रूपच म्हणायचे. तर कवितेचे जनक संत विष्णुदास कृष्ण बहूकाळा म्हणजे गडद काळा आहे असा टोमणा मारतात. अशा काळोख्या रात्री पाणी भरायला एकटीला जाणे भितीचे आहे पण जर सोबत कृष्ण आला तर ती खुशीने जाईल. आता रात्री कोणी पाणी भरायला जाते का. पण विष्णूदासांना हेच सांगायचेआहे, कृष्ण सोबत असेल तर काळोख असताना देखील अंतर पार करायची तयारी गोपी दाखवते जेवढे नाट्यपूर्ण आहे तेवढेच ते जीवनाचा सार सांगणारे आहे. आपल्याला जसा भावेल तसा आपण अर्थ घेऊ शकतो.
रात्र काळी, घागर काळी । यमुना जळें ही काळीं वो माय
बुंथ काळी, बिलवर काळी । गळा मोती एकावळी काळी वो माय ॥धृ॥
मी काळी, कांचोळी काळी । कांस कासोली चे काळीं गो माय ॥१॥
बुंथ काळी, बिलवर काळी । गळा मोती एकावळी काळी वो माय ॥धृ॥
एकली पाण्याला नव जाय साजणी ।सवें पाठवा मूर्ति सांवळी गो माय ॥२॥
बुंथ काळी, बिलवर काळी । गळा मोती एकावळी काळी वो माय ॥धृ॥
विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।कृष्णमूर्ति बहूकाळी वो माय ॥३॥
रात्र काळी, घागर काळी । यमुना जळें ही काळीं वो माय बुंथ काळी,
बिलवर काळी । गळा मोती एकावळी काळी वो माय ॥धृ॥
येथे गाणे ऐकायला मिळेल. ........ रात्र काळी, घागर काळी..........