अद्वैतची इतिहासाची अभ्यासपुस्तिका
धडा ३: हडप्पा संस्कृती
* उत्खनन म्हणजे खणणे. इतकी चांगली संस्कृती होती तर ती खणून का काढली असेल समजत नाही.
* उत्खननाचे वर्ष, हडप्पा आणि मोहेंजोदडो यांतले अंतर आणि हडप्पा संस्कृतीची ठिकाणे एवढे पाठ करून ठेवावे. बाकी या मुद्द्यात विशेष अर्थ नाही.
* नकाशातल्या गावांना फार विचित्र नावे दिली आहेत. काही नावे तर शिव्यांसारखी वाटतात.
* "धाब्याची घरे म्हणजे तुमची का?" असे शेजारच्या धाबेकाकांना विचारले तर ते फक्त हसतात. उत्तर देत नाहीत. त्यांना उपकलम (ज) म्हणून दाखवले तरीही ते उत्तर देत नाहीत. विमानाचा पायलट, रेल्वे इंजिन ड्रायव्हर किंवा बस ड्रायव्हर यातले काहीच होता आले नाही तर मला वैज्ञानिक व्हायचे आहे. पण जिज्ञासूवृत्ती जोपासायला कुणी मदतच करीत नाही.
* कच्च्या आणि भाजक्या विटांचा उल्लेख बघता त्या काळी विटा खात असतील का? मला कच्च्या शेंगदाण्यांपेक्षा भाजके शेंगदाणे आवडतात.
* 'सांडपाणी वाहून नेणारी गटारे झाकलेली नसतील तर आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या निर्माण होतात?'. अशा गटारात बॉल पडून वाहून जातो. नवीन बॉल आणायला आई पैसे देत नाही. दिलेच तर फटके देते. त्यामुळे पाठ दुखते आणि आरोग्याची समस्या निर्माण होते. पण जंगमसर हे उत्तर मान्य करत नाहीत.
* 'करून पहा' यामध्ये दिलेली कृती करून पाहू नये. बटाटा मधोमध कापायला गेले तर आई लगेच हातातून बटाटा नि सुरी काढून घेते. तिला पुस्तक दाखवायला गेले तर धपाटा घालते. तिला वाचायला येत नसेल का? पण पोस्टात तर ती सारखी काहीतरी लिहिताना दिसते. कदाचित फक्त लिहिता येत असेल, वाचता येत नसेल.
* मातीची भांडी तयार करणाऱ्या कारागिराची मुलाखत घेण्यासाठी जोर्वे आळीतल्या कुंभाराकडे जाऊ नये. त्याच्या दारात बांधलेली म्हैस मारकी आहे. तसाही तो कुंभार बोलत नाही, सारखा तंबाखू खाऊन थुंकत असतो.
* 'सध्याचा पोहण्याचा तलाव व हडप्पाकालीन स्नानगृह यांची तुलना करा'. आमच्या गावात पोहण्याचा तलाव नाही. पुण्याला आहे, पण बाबा तिथे घेऊन जात नाहीत. त्यांनाही माझे वैज्ञानिक होणे मान्य नसेल का?
* 'तुमच्या परिसरात/गावात होणाऱ्या पिकांची, फळांची नावे लिहा'. आमच्या गावात सगळी पिके आणि फळे मिळतात. मग किती नावे लिहीत बसायची?
* 'तुम्हांला माहीत असलेल्या दागिन्यांची नावे लिहा'. यासाठी आईला विचारायला गेले तर ती "हो, दागिनेच कशाला, तुला परकर साडी नेसवून कुंकू लावते" असे म्हणते. दागिन्यांचा आणि परकराचा काय संबंध असेल?
* हडप्पा संस्कृतीत तीळ होते. पण त्यांना तिळगुळाच्या मऊ वड्या करता येत असतील का? मला आजीच्या हातच्या वड्या फार आवडतात. आजी त्यात थोडे शेंगदाण्याचे कूटही घालते.
* 'किराणा मालाचा दुकानदार वाणसामान कोठून आणतो याची माहिती घ्या'. कोपऱ्यावरच्या दुकानातले काका याचे उत्तर "वो उधरसे आता है" असे देतात. पण जंगमसरांना ते मान्य होत नाही.
* देवदाराचे लाकूड देवांच्या दारासाठी वापरले जात असावे. पण राक्षस काय वापरत असतील मग? राक्षसदार अशा लाकडाचा कुठे उल्लेख नाही. बिचारे राक्षस बिनदारांच्या घरात राहत असतील का?
* 'लोथल येथील गोदी' या चित्राची हुबेहूब कॉपी केली तर चित्रकलेचे सर खूष होतात.
* नागर संस्कृती आणि नांगर यांचा संबंध काय असेल? दोन्ही सारखेच असतील तर एक टिंब का वाया घालवतात?
* हडप्पा संस्कृतीचे नाव कुठून आले असेल? त्या संस्कृतीत हाडे खाणारा अप्पा नावाचा कुत्रा होता असे आजोबा म्हणतात. आजोबा वात्रटपणा करताहेत असे आजी म्हणते. वात्रट हा मस्त शब्द आहे.
* मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र काढताना त्यात गीझर व शॉवर दाखवू नयेत. मोहेंजोदडोच्या लोकांना या दोन्ही गोष्टी परवडत नव्हत्या.
* 'एका शब्दात उत्तरे मिळतील असे प्रश्न तयार करा' हे सोपे आहे. पण यातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बाबा "नाही" याच एका शब्दाने देतात त्याला काय करायचे?
* घरातील धान्य साठवण्याच्या पद्धतींचे टिपण मनानेच करावे. प्रत्यक्षात करायला गेले तर गव्हाचा डबा जड असल्याने हातातून पडतो. मग आईचा आरडाओरडा सुरू होतो.
* हडप्पाकालीन खेळणी अगदीच फडतूस दिसतात. अशा खेळण्यांमुळेच ती संस्कृती लयाला गेली असेल का? त्यांच्याकडे मॉन्स्टर ट्रक्स किंवा पोकेमॉन असते तर कदाचित अजून टिकले असते.
धडा ४: वैदिक संस्कृती
* आम्ही वैदिक संस्कृती शिकतो असे सांगितल्यावर कॉलनीतले गणपुलेआजोबा खूष होतात. त्यांना चार वेदांची नांवे घडाघडा म्हणून दाखवली की ते कधीकधी छोटे स्निकर्सही देतात.
* वैदिक संस्कृतीत पाऊस पडू दे असे सारखे म्हणायचे. त्या काळी रेनकोट असतील की छत्र्या? मी वैदिक काळातली छत्री शोधून काढली तर मला गणपुलेआजोबा टॉब्लेरॉन देतील का? त्यांचा मुलगा अमेरिकेतून खूप चॉकलेट्स पाठवतो. पण ते फक्त स्निकर्सच देतात.
* अथर्व हे ऋषींचे नाव असेल तर मग वर्गातल्या अथर्वचे नांव तसे का ठेवले असेल? अथर्व फारच मठ्ठ आहे. फोनवर कॉल करायला सांगितले तर सेल्फी घेत बसतो.
* वैदिक काळात फार यज्ञ करीत. त्या काळी काडेपेट्या असतील का? थंडीत त्या यज्ञांशेजारी बसायला मजा येत असेल.
* आईच्या एका मैत्रिणीचे नाव मैत्रेयी आहे. पण ती विद्वान नाही. नुसतीच प्राध्यापक आहे.
* वेदकालीन लोकांना लोणी, तूप आणि मध आवडत असे. म्हणजे ती चांगली माणसे असावीत.
* वेदकालीन घरांचे चित्र बघितल्यावर वेदकालीन मुलांची किती मज्जा होत असेल ते कळते. घसरगुंडी खेळायला बाहेर जायची गरज नाही, घराचे छप्पर पुरे.
* वेदकालीन लोक मांस खात. म्हणजे चिकन की मटन? आणि आई हे दोन्ही का खाऊ देत नाही?
* वेदकालात प्राण्यांच्या कातड्याची वस्त्रे करीत. मी कातडे काढण्यासाठी मेलेला उंदीर घरात आणला तर आई का ओरडते?
* वेदकालातल्या प्राण्यांच्या यादीत मांजर नाही. मग त्याकाळी उंदीर कोण मारीत असेल? ऋषी स्वतः?
* दिलेल्या माहितीवरून वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमात फारसा फरक दिसत नाही. मग दोन वेगवेगळे आश्रम करून जागा का वाया घालवत असतील? कदाचित खालच्या मजल्यावर वानप्रस्थाश्रम आणि गच्चीवर संन्यासाश्रम असे असेल.
* अग्नीमध्ये पदार्थ अर्पण करणे म्हणजे तंदुरी चिकनसारखे काही असेल का?
* 'पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे कराल' हा प्रश्न चुकीचा आहे. आमच्याकडे ऍक्वागार्डच्या फिल्टरमधून पिण्याचे पाणी येते. त्यासाठी इलेक्ट्रिसिटी आणि टाकीतले पाणी लागते, पाऊस आला नाही तरी चालते.
* पुराण आणि पुरणपोळीतले पुरण यांचा काही संबंध असेल का? पुराणावर तूप घातले तर ते चविष्ट लागेल का? माहीत नाही. आई तसे करू देणार नाही.
* वेदकाळात गाईंची विशेष काळजी घेतली जाई. मग बैलांची काळजी कोण घेत असेल?
* वेदकालीन घरांमध्ये इन्व्हर्टर असतील का?
** धडा ५: प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
* पंथ आणि धर्म यात काय फरक असावा? जंगमसर दोन्ही एकच असे सांगतात. पण जंगमसरांना फक्त गणित चांगले येते. ते इतिहास याच वर्षी शिकवायला लागले असे धोंगडेबाईंचा मुलगा म्हणतो. तो आठवीत आहे.
* जैन हा जर धर्म असेल तर वर्गातला आरुष जैन "आम्ही जैन नाही, हिंदू आहोत" असे का म्हणतो? तो जर खरेच हिंदू असेल तर 'हिंदू' आडनांवाची माणसे जैन धर्मात असतील का?
* जैन धर्म अहिंसा पाळत असेल तर जैन माणसे काय खात जेवत असतील? झाडांमध्येही जीव असतो.
* तीर्थंकर २४च का असतील? दशमानपद्धतीसारखी त्या काळी डझनपद्धत असेल का? की क्रिकेटच्या दोन टीम (प्रत्येक टीममध्ये एक रिझर्व प्लेअर) असतील?
* जिन म्हणजे जिंकणारा असा अर्थ असेल तर बाबा जिन प्यायले तर आई का चिडते? बाबा जिंकलेले तिला आवडत नाही का? चिडण्या ऐवजी तीसुद्धा का जिन पीत नाही?
* पंचमहाव्रतांमध्ये सत्य हे दुसरे व्रत. पण हे अपूर्ण आहे. सत्य सांगितल्यानंतर मिळणारे फटके कुठल्या व्रतात बसवायचे?
* मादक पदार्थ म्हणजे काय असेल? रेड बुल हे मादक पेय आहे असे अन्वय म्हणतो.
* ज्यू लोकांच्या सिनेगॉगचा फोटो छान आहे. पण एवढ्या सगळ्या खिडक्या असतील तर आत खूप धूळ जात असेल. आणि पावसात पाणी. ज्यू धर्मामध्ये फरशी झाडा-पुसायला परवानगी असते का? बौद्ध धर्मात असते कारण आमच्याकडे झाडपूस करायला येणाऱ्या आवडाबाई बौद्ध आहेत. बुद्धपौर्णिमेला त्या सुटी घेतात.
* ख्रिश्चन धर्मामुळे आपल्याला ब्रेड, बिस्किटे आणि केक या गोष्टी मिळाल्या असे अर्चित म्हणतो. हे खरे असेल तर ख्रिश्चन धर्म चांगला आहे. कारण ख्रिश्चन लोक या गोष्टी इतर धर्मातल्या लोकांनाही खाऊ देतात.
* ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे धर्म पहिल्यांदा केरळमध्येच का आले? तेव्हां केरळच्या तिकिटांवर खूप डिस्काऊंट मिळत असेल का?
* पारशी धर्मात आग आणि पाणी या गोष्टींना महत्त्व आहे. पण या दोन्ही गोष्टी एकत्र करता येत नाहीत. आमच्याकडे जसे आत्या नि मावशी यांना एकत्र येऊ देत नाहीत तसे पारशी लोक करत असतील का?
* हा धडा एकंदरीतच खूप कठीण शब्दांनी भरलेला आहे. शक्य तितके पाठ करून ठेवावे. समजले नाही तरी चालते.
* विविध धर्माच्या प्रार्थनास्थळांना भेटी देण्यासाठी पुण्यातल्या सिनेगॉगला जाऊ नये. आत सोडत नाहीत. गावातल्या मशिदीतही जाऊ नये. गणपुलेआजोबांनी पाहिले तर खूप आरडाओरडा करतात.