अद्वैतची इतिहासाची अभ्यासपुस्तिका
धडा ५: प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
* पंथ आणि धर्म यात काय फरक असावा? जंगमसर दोन्ही एकच असे सांगतात. पण जंगमसरांना फक्त गणित चांगले येते. ते इतिहास याच वर्षी शिकवायला लागले असे धोंगडेबाईंचा मुलगा म्हणतो. तो आठवीत आहे.
* जैन हा जर धर्म असेल तर वर्गातला आरुष जैन "आम्ही जैन नाही, हिंदू आहोत" असे का म्हणतो? तो जर खरेच हिंदू असेल तर 'हिंदू' आडनांवाची माणसे जैन धर्मात असतील का?
* जैन धर्म अहिंसा पाळत असेल तर जैन माणसे काय खात जेवत असतील? झाडांमध्येही जीव असतो.
* तीर्थंकर २४च का असतील? दशमानपद्धतीसारखी त्या काळी डझनपद्धत असेल का? की क्रिकेटच्या दोन टीम (प्रत्येक टीममध्ये एक रिझर्व प्लेअर) असतील?
* जिन म्हणजे जिंकणारा असा अर्थ असेल तर बाबा जिन प्यायले तर आई का चिडते? बाबा जिंकलेले तिला आवडत नाही का? चिडण्या ऐवजी तीसुद्धा का जिन पीत नाही?
* पंचमहाव्रतांमध्ये सत्य हे दुसरे व्रत. पण हे अपूर्ण आहे. सत्य सांगितल्यानंतर मिळणारे फटके कुठल्या व्रतात बसवायचे?
* मादक पदार्थ म्हणजे काय असेल? रेड बुल हे मादक पेय आहे असे अन्वय म्हणतो.
* ज्यू लोकांच्या सिनेगॉगचा फोटो छान आहे. पण एवढ्या सगळ्या खिडक्या असतील तर आत खूप धूळ जात असेल. आणि पावसात पाणी. ज्यू धर्मामध्ये फरशी झाडा-पुसायला परवानगी असते का? बौद्ध धर्मात असते कारण आमच्याकडे झाडपूस करायला येणाऱ्या आवडाबाई बौद्ध आहेत. बुद्धपौर्णिमेला त्या सुटी घेतात.
* ख्रिश्चन धर्मामुळे आपल्याला ब्रेड, बिस्किटे आणि केक या गोष्टी मिळाल्या असे अर्चित म्हणतो. हे खरे असेल तर ख्रिश्चन धर्म चांगला आहे. कारण ख्रिश्चन लोक या गोष्टी इतर धर्मातल्या लोकांनाही खाऊ देतात.
* ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे धर्म पहिल्यांदा केरळमध्येच का आले? तेव्हां केरळच्या तिकिटांवर खूप डिस्काऊंट मिळत असेल का?
* पारशी धर्मात आग आणि पाणी या गोष्टींना महत्त्व आहे. पण या दोन्ही गोष्टी एकत्र करता येत नाहीत. आमच्याकडे जसे आत्या नि मावशी यांना एकत्र येऊ देत नाहीत तसे पारशी लोक करत असतील का?
* हा धडा एकंदरीतच खूप कठीण शब्दांनी भरलेला आहे. शक्य तितके पाठ करून ठेवावे. समजले नाही तरी चालते.
* विविध धर्माच्या प्रार्थनास्थळांना भेटी देण्यासाठी पुण्यातल्या सिनेगॉगला जाऊ नये. आत सोडत नाहीत. गावातल्या मशिदीतही जाऊ नये. गणपुलेआजोबांनी पाहिले तर खूप आरडाओरडा करतात.
धडा ६: जनपदे आणि महाजनपदे
* पुण्याला मामाच्या शेजारी एक अवंती नावाची चौथीतली मुलगी राहते. ती या नकाशात आणि कोष्टकात दाखवलेली अवंती असेल का?
* महाजनपदांचे कोष्टक पाठ करून ठेवावे.
* महाजनपदांत महाराष्ट्रातले फक्त एकच ठिकाण का आहे? बाबांना विचारले तर ते "मराठी माणसांवर अन्याय तेव्हांपासून आहे. राज ठाकरेंना सांगायला हवे" असे म्हणतात. राज ठाकरे महाजन असतील का?
* 'किल्ल्याला भेट द्या' या उपक्रमासाठी बाबांच्या मागे लागून सिंहगडावर जाऊ नये. तिथे नेहमीच तुफान गर्दी असते. त्या गर्दीत टोपी हरवली तर बाबा नवीन घेऊन देत नाहीत. आणि तिथल्या भज्यांपेक्षा आपल्या गावातली परांडेकाकांकडची भजी जास्ती चांगली असतात.
* भारतीय लष्कराची माहिती शेजारच्या केरकरआजोबांना विचारू नये. ते जरी लष्करातून निवृत्त झालेले असले तरी. माहिती सांगण्याऐवजी ते १९७१च्या युद्धाबद्दलच बोलत बसतात. बोलण्याचा जोर वाढला की त्यांना खोकला येतो. मग आजी आतून येऊन त्यांच्यावर ओरडतात. मग आजींनाही खोकला येतो. शेवटी त्यांच्या सूनबाई, म्हणजे कालिंदीकाकू, येऊन दोघांना गप्प करतात नि मला पळवून लावतात.
धडा ७: मौर्यकालीन भारत
* पुण्यातल्या इराणी कॅफेचे मालक इराणमधून आले असे मामा म्हणतो. इराणला जाण्यासाठी उबर मिळत असेल का?
* सिकंदराचे खरे नाव अलेक्झांडर होते असे जंगमसर म्हणतात. माझे नाव अद्वैत ऐवजी विदीत लिहीले तर चालेल का? सिकंदर केवळ सम्राट म्हणून त्याला दोन वेगवेगळी नावे मिळणे चुकीचे आहे.
* "चंद्रगुप्त म्हणजे अमावास्या" असे अनिकेतदादा म्हणतो. "हा पीजे आता जुना झाला" असे अनघाताई म्हणते. मग दोघांच्या फोनची रेंज जाते.
* मेगॅस्थेनिसच्या पुस्तकाचे नाव इंडिका कशावरुन ठेवले असेल? इंडिका कार तेव्हांपासून आहे का?
* बिंदुसार हे नाव मजेदार आहे. कोकमसार हेही राजाचे नाव असेल का?
* प्रत्येक धड्यात भारताचा नकाशा तोच असतो पण नावे वेगवेगळी असतात. त्यामुळे गोंधळ होतो. एकच मोठा नकाशा काढून त्यावर सगळी नावे का लिहीत नाहीत?
* सम्राट अशोकाने माकडांच्या शिकारीवर का बंदी घातली असेल? माकड आपले पूर्वज हे त्याला माहीत असेल का?
* गेंड्यांच्या शिकारीवर का बंदी घातली असेल? गेंड्यांच्या शिकारीसाठी स्पेशल बुलेट्स लागतात आणि त्या फक्त रशियन सैन्याकडेच आहेत असे अर्चित म्हणतो. तसा एक व्हिडिओ यूट्यूबवर आहे म्हणे.
* मौर्य राजवटीमध्ये फक्त उत्तर विभाग पाकिस्तानात का ठेवला असेल? भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस उत्तर विभागातले लोक काय करत असतील?
* स्तंभशीर्षावरच्या सिंहांच्या मिशा फार मोठ्या आहेत. त्याही रंगनिकेतनमधल्या मोघेकाकांनी लावून दिल्या असतील का? मोघेकाका इतके म्हातारे असतील असे वाटत नाही.
* इतिहासात कुठल्याही लढाया 'का सुरू झाल्या' हा एक वैताग आणणारा प्रश्न आहे. भांडखोर लोकांना इतिहासात कुठेही पाठवा. ते लढाया करतातच. विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांनी एकच महायुद्ध करायला हवे होते. आणि त्याचे कारण 'विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी' असे लिहून ठेवायला हवे होते.
* युआन श्वांगसारखा परदेशी प्रवासी भेटला तर मी हाक्का नूडल्सची रेसिपी विचारेन. आईला अजिबात जमत नाही. पण तरीही आम्हांला त्या खाव्या लागतात.
* मौर्य राजवटीमध्ये बुद्धिबळ खेळत. अशा बैठ्या खेळांमुळेच त्या राजवटीचा ऱ्हास झाला असेल का? ते क्रिकेट नाहीतर फुटबॉल खेळत असते तर ती राजवट अजून टिकली असती का?