अद्वैतची इतिहासाची अभ्यासपुस्तिका भाग ६

नागरिकशास्त्र धडा १: आपले समाजजीवन

* 'समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते' हे कळाले नाही. उलट शाळेत मुले एकत्र असली की मारामाऱ्या होतात नि घरी एकटे असले की सुरक्षित वाटते.

* धड्यातली चित्रे काहीच्याकाही आहेत. मातीच्या रस्त्यावर दोन कारची रेस, रस्त्याकडेला झाडे, आणि रस्त्यात मध्येच एक मुलगा कंप्यूटरवर विमानाचे चित्र बघतो आहे. काहीही.

* 'चित्रकलेच्या स्पर्धेत तुम्हांला पहिले बक्षीस मिळाले आहे. ते स्वतःजवळच ठेवाल की मित्रमैत्रिणींना दाखवाल?'. काहीही प्रश्न विचारतात. बक्षीससमारंभाला आई किंवा बाबा येणारच. मग बक्षीस तेच ताब्यात घेतील ना?

* 'सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते याची एक सूची तयार करा. त्यांतील किमान पाच वस्तू तयार करण्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात कोणाकोणाचा सहभाग असतो ते शोधा'. कोलगेट. कंपनी तयार करते, कोपऱ्यावरचा दुकानदार पोहोचवतो. दूध. गाय तयार करते. कोपऱ्यावरचा दुकानदार पोहोचवतो. ब्रेड. कंपनी तयार करते, कोपऱ्यावरचा दुकानदार पोहोचवतो. बटर. कंपनी तयार करते, कोपऱ्यावरचा दुकानदार पोहोचवतो. मॅगी. कंपनी तयार करते, कोपऱ्यावरचा दुकानदार पोहोचवतो.

* समाजात फक्त माणसांचा समावेश आहे हे वाईट आहे. मांजरांचाही समावेश असायला हवा होता. विशेषतः आमचा बंड्या बोका.

* 'सर्वजण कायद्यापुढे समान आहेत' हे खोटे आहे. 'नाही' म्हणण्याचा अधिकार फक्त आईबाबांनाच आहे. साखर न घातलेले दूध, चीज न घातलेली मॅगी अशा गोष्टींना 'नाही' म्हणण्याचा अधिकार मला मिळाला तर ते खरे होईल.

* 'अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे' हेही खोटे आहे. कोपऱ्यावरच्या दुकानदाराकडे पोतीच्या पोती तांदूळ आहेत. तो शेतीच काय, कुंडीत झाडेसुद्धा लावत नाही.

* 'उपक्रम' मध्ये 'जवळच्या बॅंकेला भेट देऊन ती बॅंक कोणकोणत्या कामांसाठी कर्ज देते याची माहिती घ्या' असे दिले आहे म्हणून बाबांना विचारले. "पैसे बुडवून भारताबाहेर पळून जायचे असले तरच आम्ही कर्ज देतो" असे ते ओरडले. म्हणजे काय कळाले नाही.

* 'मानवाच्या नवीन गरजा' साठी टीव्ही आणि सेलफोन या गोष्टी जंगमसर मान्य करीत नाहीत. आणि त्यांच्याकडे दोन्ही आहेत.


नागरिकशास्त्र धडा २: समाजातील विविधता

* कन्नड भाषा शिकायला हवी. एक तरी सीक्रेट भाषा माहीत असलेली बरी. जेव्हा माझ्याकडे सेलफोन येईल तेव्हा मी त्या भाषेत बोलीन म्हणजे आईबाबांना कळणार नाही.

* 'करून पहा' मध्ये दिले आहे 'तुम्हांला गिअर असणारी सायकल हवी आहे. परंतु ताईच्या फीचे पैसेही भरायचे आहेत. तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवता'. मला ताई नाही. तरीही गिअर असणारीच काय, साधी सायकलही बाबा घेऊन देत नाहीत.

* पुढच्या पानावरच्या चित्रातही एक मुलगा एक मुलगी अशी बहीणभावंडे दाखवली आहेत. मग मलाच बहीण का नसावी?

* 'तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत, तर तुम्ही काय कराल?' मी तिथून निघून जाईन. भांडण चालू असताना शारिरीक शिक्षणाचे उतेकर सर आले तर ते भांडण बघणाऱ्यांसकट सगळ्यांना शिक्षा करतात. वरून "इथे काय तमाशा चालू आहे का?" असे विचारतात. मी एकदा सिनेमात तमाशा बघितला होता. पण तिथे कुणी भांडत नव्हते, नुसते नाचत होते. उतेकर सरांना नाचणे आणि भांडणे यातला फरक कळत नाही हे आश्चर्य आहे. त्यांचे म्हणे लग्न झालेले नाही. लग्न न झाल्याने असे होत असेल का?


नागरिकशास्त्र धडा ३: ग्रामीण स्थानिक शासन संस्था

* तीन पातळ्यांवरून राज्यकारभार कसा चालवत असतील? सर्वात वरची पातळी संघशासनाची असेल तर सगळीकडे त्यांचेच ऐकत असतील. मग खालच्या दोन पातळ्या कशासाठी?

* आमचे गाव ग्रामीण भागात येत नाही. त्यामुळे आमच्याकडे ग्राम पंचायत नाही. मग हा अख्खा धडा आम्हांला कशासाठी? फक्त पाठांतर वाढवण्यासाठी?


नागरिकशास्त्र धडा ४: शहरी स्थानिक शासन संस्था

* शहरांमधे 'जागेची टंचाई' ही समस्या खरेच आहे. दप्तर आणि पुस्तके ठेवण्यासाठी मला टेबलाचा खण पुरत नाही. पण आमच्या इथे नगरपंचायतीचा पत्ता मला माहीत नाही. मग तक्रार कशी करायची? पुस्तकात हे द्यायला हवे होते. जंगमसरांना नेहमीप्रमाणे काही माहीत नसते.

* 'रुग्णवाहिकेचा सायरन जोरात वाजत होता आणि मोकळा रस्ता मिळत नव्हता' यात चर्चा करण्यासारखे काय आहे? आमच्या गावात कधीच मोकळा रस्ता मिळत नाही. गायी नाहीतर बैल सतत रस्त्यात बसलेले असतात.

* घरपट्टी आणि पाणीपट्टी याचे अर्थ कळले नाहीत. सरांनाही माहीत नव्हते. पट्टीने घराची लांबी मोजता येऊ शकेल, खूप वेळ लागेल. पण पट्टीने पाणी कसे मोजायचे? गच्चीतल्या टाकीत उतरायला गेलो तर शेजारचे कुलकर्णीकाका आरडाओरडा करायला लागले नि तेव्हा आई घरी होती. कुलकर्णीकाकांना मी गच्चीत गेलो की ओरडायची वाईट सवय लागलेली दिसते.

* 'पुलावरून अनेकजण नदीत निर्माल्याच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकत आहेत...' ही परिस्थिती आमच्याकडे कधीच येत नाही. नदी थोडी लांब असल्याने तिथपर्यंत न जाता सगळेजण कचरा रस्त्याकडेलाच टाकून देतात.

* 'पाणीपुरीसाठी अस्वच्छ पाणी वापरले जात असल्याचे तुमच्या लक्षात आले आहे...' ही परिस्थितीही माझ्या बाबतीत तरी कधी येणार नाही. कारण बाबा पाणीपुरी कधीच घेऊन देत नाहीत. मग ते पाणी अस्वच्छ आहे की फिल्टरचे आहे हे मला कसे कळेल? पाणीपुरीच्या गाडीजवळून जाताना जे छान वास येतात तेवढ्यावरच मला कायम भागवावे लागते.

* वर्गाच्या शिक्षण समितीत मला नेमले आणि वर्गाच्या छोट्या ग्रंथालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव तयार करायचा झाला तर (१) मी एक पुस्तकांची यादी तयार करीन (२) बाकीचे सभासद ती यादी अमान्य करून ग्रंथालया ऐवजी सहलीला जाण्याचा प्रस्ताव पास करतील.

* 'शुद्ध पाण्याचा वापर बागा व गाड्या धुण्यासाठी करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे' हे आमच्या गावात गैरलागू आहे. आमच्या गावात शुद्ध पाणी येत नाही. घरोघरी ऍक्वागार्ड बसवले आहेत.

* 'ओला कचरा परिसरातच जिरवण्याचे बंधन घातले आहे'. घरी आईने कंपोस्टिंगचा प्रयोग केला. पण डास आणि माश्या खूप होतात म्हणून बाबांनी तो विस्कटून टाकला. मग दोघे भांडत बसले.

* 'चोवीस मजली इमारत बांधायला परवानगी मिळाली आहे' असे खरेच झाले तर मज्जा येईल. चोविसाव्या मजल्यावरून विमाने अजून जवळ दिसतील. पायलटचा चेहराही दिसेल कदाचित. सगळे पायलट कायम गॉगल लावून असतात का?

* या धड्याच्या स्वाध्यायासाठी पाठांतराला पर्याय नाही.


नागरिकशास्त्र धडा ५: जिल्हा प्रशासन

* जिल्हा परिषदेच्या प्रमुखाला जिल्हाधिकारी म्हणत नाहीत. हे गोंघळात टाकणारे आहे. जिल्हा परिषदेचे नाव नुसतेच परिषद केले तर चांगले होईल. पुणे परिषद, सांगली परिषद असे.

* दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी आडनांव दिवाण असणे गरजेचे असते का?

* एक खिडकी योजना चुकीची आहे. एकच खिडकी असेल तर उन्हाळ्यात खूप त्रास होईल. आणि हिवाळ्यात आत पुरेसे ऊन येणार नाही. फक्त पावसाळ्यात फायदा होऊ शकेल. पण कितीही खिडक्या असल्या तरी त्या पावसाळ्यात लावून घेता येतात. एका खिडकीचे काय कौतुक?

* 'प्रशासन व सामान्य जनता यांच्यातील दरी कमी व्हावी' जर सरकारी कार्यालय सपाट जमिनीवर बांधले तर दरीचा प्रश्न येणारच नाही.

* या धड्याच्या स्वाध्यायासाठी, एकंदरीत नागरिकशास्त्रासाठीच, पाठांतराला पर्याय नाही.