"हे हाऽय.." मागून कोणीतरी बोललं. वळून पाहिलं तर विजय.
"हाय. कधी आलास?"
"कधीचं सांगतोय तुला, पण गप्पांमधून तुझं लक्ष जाईल तर ना.."
"अरे.." मी काही बोलणार तेवढ्यात जीएस दिसले. "अरे ते बघा जीएससुद्धा आले.." असं म्हणत आम्ही सगळे जीएसकडे गेलो.
"सगळे लोकं अशा नजरेनी बघत आहेत जणू काही मी बसमधून जाण्यासाठी आलेल्या लोकांना फितवून माझी गाडी भरतो आहे !" या जीएसच्या प्रसंगनिष्ठ विनोदाला दिलखुलास दाद देत सर्वजण गाडीच्या दिशेने जायला लागले. मनात उगीच येत होतं कोणकोण असेल गाडीत?
क्वालीसच्या पुढच्या दोन्ही बैठकी आधीच भरलेल्या होत्या, त्यामुळे अनायासे मला माझ्या आवडत्या अशा मागच्या सुटसुटीत जागी बसायची संधी मिळाली. मी, माझ्या शेजारी साधना आणि आमच्या समोरच्या जागी पंकजद्वय आणि विजय असे बसले. ड्रायव्हरशेजारी दोन, मध्ये चार आणि मागे पाच असे एकूण आम्ही अकरा ( की बारा?) जणं ट्रेकींगला निघालो. खरंतर असं काही कुठे जायचं म्हटलं की पुजा करणे, गाडीच्या चाकाखाली नारळ फोडणे आणि मुख्य म्हणजे प्रसाद वाटणे हा प्रकार झाला नाही. कसा होणार? ट्रेकची खरी सुरूवात पुण्यातच झालेली ना.. आम्हा पाच जणांचा डबा नंतर जोडला गेलेला मुंबईला. ना कुठली आरोळी, ना ट्रेकला निघाल्याचा जल्लोष.. सुंदर सिनेमाचा स्टार्ट गेल्यावर लागते ती चुटपूट लागल्याचा भास झाला. तरीही आम्हा चौघांचा आधीच सुरू झालेला गप्पांचा ओघ तसाच सुरू राहिला. आत्ता भाग घेतील नंतर भाग घेतील म्हणत तब्बल १५ मिनिट झाली तरी विजय आणि समोरच्या जीएसव्यतिरिक्त कोणाचाच आमच्या गप्पांमध्ये सहभाग नाही, त्यामुळे ओळख वगैरे काही होण्याचा प्रश्न नाही. शेवटी न राहवून मी विचारलं,"इकडे ओळख परेड काही होणार नाही का?"
"होणार आहे. पण आत्ता नाही, नाश्ता घेऊ तिथे होणार आहे." इति जीएस.
मग अंताक्षरी सुरू झाली, समोरच्यातले काहीकाही मनुष्यप्राणी भाग घेत होते ( नाव माहित नाही मग कसा उल्लेख करणार त्यांचा? ) हिंदी गाण्यांची अंताक्षरी सुरू असताना मधल्या बैठकीतून जेव्हा गाणं ऐकू यायला लागलं तेव्हा हिंदीच असणार हा मुद्दा खोटा ठरवत मराठी गाणं अवतरतंय हे लक्षात आलं, तेव्हा खूपच मौज वाटली ! मग हिंदी/मराठी कॉकटेल अंताक्षरी सुरू झाली !
खोपोली ते पाली रस्ता खूपच खराब होता .. क्वालीसमध्ये बसलेलो नसून एखाद्या मनात येईल तसे हेलकावे खाणाऱ्या झोक्यात बसल्यासारखं वाटत होतं. "अरेरे, काय ही गत.. बघा सायकलवालासुद्धा आपल्याला ओव्हरटेक करून गेला." या विनोदावर हसावं की सत्यपरिस्थितीवर रडावं ते कळेनासं झालं होतं.
"अरे पण आपण कित्येक चार चाकी गाड्यांना ओव्हरटेक केलं आहे त्याचं काय?" असं म्हणणाऱ्या पंकजकडे आश्चर्याने बघत असताना त्याने दाखवलेल्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या पाहून जाम हसू आलं.
मजलदरमजल करतकरत आमची गाडी पुढेपुढे सरकत होती, आमच्या गप्पांना आणि गाण्यांना ऊत येत होता. सगळं छान छान चाललं होतं आणि अचानक कहानीमे ट्वीस्ट आ गया ! 'धूर.. धूर' इतकेच शब्द ऐकू आले मला.. आणि गाडी थांबली सगळेजण गाडीतून बाहेर पडायला लागले. काय झालं विचारता कळलं की सोबत घेतलेल्या ऍसिडच्या बाटलीची सोबत ठेवलेल्या ब्रासच्या कुठल्याशा वस्तूबरोबर अभिक्रिया होऊन धूर निघत होता ! पंकजने सगळी परिस्थिती हातात घेऊन जवळच्याच शेताशेजारी साठलेल्या पाण्याकडे 'ते' सर्व सामान घेऊन जाऊन विल्हेवाट लावली आणि 'काहीही झालं नाही.' म्हणत परत यायला सुरूवात केली.
"अरे पण शेत आहे तिथे. हे असं करणं बरोबर नाही. शेतकऱ्याला काही.." ( सर्वार्थाने मोठे असलेले पंकज इतक्या वेळच्या गप्पांनी एकेरीत आले होते.)
या माझ्या प्रश्नावर पंकजने त्याचं अनुभवसिद्ध रासायनिक ज्ञान सांगून असा काहीही धोका नसल्याचं सांगितलं, तेव्हा कुठे बरं वाटलं आणि त्याच्या ज्ञानाचं कौतुकही. ऍसिडची ट्रेकमध्ये काय जरूर होती या प्रश्नावर "गडावर पोहोचल्यावर तिथे पेंट्सचा वापर करून लिहिल्या गेलेल्या आणि गडाचं सौंदर्य खराब करणाऱ्या संदेशांना खोडण्यासाठी घेतलं होतं" हे कळताच सानंद आश्चर्य वाटलं.
पुढील प्रवास निर्धोक पार पडला आणि पालीला पोहोचल्यावर एका टपरीवजा दुकानावर सकाळचा नाश्ता घ्यायला पोहोचलो. काय घेणार वगैरे विचारून पोह्यांची ऑर्डर देण्यात आली. ते यायला वेळ आहे कळताच भज्यांची ऑर्डर देण्यात आली ! सगळेजणं खुर्च्यांवर गोल करून बसलो. "हं.. आता प्रत्येकाने ओळख करून द्या स्वतःची" असं जीएस म्हणाले तेव्हा आपोआपच खुललेली माझी कळी "वेदश्री, कर सुरूवात.." असं पालुपद पुढे जोडलं जाताच उंच पर्वतावरून धाऽऽऽडकन् खाली कोसळल्यासारखी झाली.. पण करता काय? दिला इंट्रो.. मग एकेक करत सर्वांच्या ओळखी झाल्या.. आणि नावं कळली.. आरती, गिरी, मिहीर-भक्ती, कुल.. हेही कळलं की मी गडव्हेंचर ( G-Adventure) ग्रुपसोबत आले आहे, जो दर रविवारी ट्रेक आयोजित करून सर करून येतो. त्यांच्या आत्तापर्यंतच्या ट्रेक्सच्या हकीकती, त्यातल्या गमतीजमती, थरारक अनुभव आरती आणि जीएसने सांगितले. सरसगडाची माहिती सांगितली गेली..
हे सर्व आटोपता आवश्यक सामान तेवढंच सामान बरोबर घेऊन रिमझिम सुरू झालेल्या हलन्त पावसात आम्हा सर्वांची तुकडी सरसगड काबीज करायला निघाली.. काहितरी चुकतंय.. काहितरी रहातंय ही माझ्या मनात असलेली भावना जीएसकडे बोलून दाखवल्यावर त्यांनी आरोळी मारली.. "हरऽऽऽ हरऽऽऽ" आणि मग सगळे ओरडलो "महाऽऽऽऽऽदेवऽऽऽ" आणि मग थोडावेळ असंच चालू राहिलं आणि मग म्होरक्याची सूचना आली,"आता पाय जास्त आणि तोंड कमी चालू द्या.." गालातल्या गालात खुदकन हसत पुढे जायला लागले.. डोंगरमाथ्याशी दिसत असलेल्या धुक्यात सामावून जायला आतुरलेल्या मनाने पुढे जायला लागले..
क्रमशः