प्रेम मागते पराधीनता, नकोच ते
जन्मभरीची आत्मवंचना, नकोच ते
वाद-वादळं, अबोला कधी , कधी रडू
मनधरणीचा खेळ रोजचा, नकोच ते
मुक्त भरारी घेत अंबरी उडायचे
केविलवाणी पंखहीनता, नकोच ते
स्वप्न वेगळे, ध्येय वेगळे असूनही
विषयापुरती एकतानता, नकोच ते
हार बाहुचा जसा साखळी गळ्यामध्ये
तोड, साधका, प्रणयशृंखला, नकोच ते
कमलदलाने कसे फुलावे सांग सख्या
भृंग सोड ही उदासीनता, नकोच ते