ताटलीत ही वडी..
(चाल- जीवनात ही घडी, अशीच राहु दे)
ताटलीत ही वडी, अशीच राहु दे !
काय कडक आहे ग, हतोडी मारु दे !
काय तुला हा सखये, छंद आगळा,
ह्या 'डिशेस' खाताना, आवळे गळा,
ईश्वरा अता मला, पळुन जाउ दे !
ताटलीत ही वडी, अशीच राहु दे !
लाटतेस तु पोळ्या, काय आगळ्या,
आकारा ज्या असती, फार वेगळ्या !
एकवार हा 'भुगोल', गोल होऊ दे !
ताटलीत ही वडी, अशीच राहु दे !
विकट हास्य करुनी ती, बोलते मला,
चाखुनी बघा भाजी, 'मस्त कारला'!
थरथरुनी बोलतो-नकोच, राहु दे!
ताटलीत ही वडी, अशीच राहु दे !
लागतो कसा 'भयाण' , हा चहा तुझा,
'लाल-लाल पाण्याची', काय ही सजा,
अंदमान ह्या कपात, 'बंद' राहु दे !
ताटलीत ही वडी, अशीच राहु दे !
पाकशास्त्र हे विराट,कुठुन लाभले,
काय हे अचाट शस्त्र,लोळती 'भले'
मी हरलो,माय गे -युद्ध थांबु दे !
ताटलीत ही वडी, अशीच राहु दे !
--मानस६