प्रेरणा - अंजू यांनी सुरु केलेली पाच प्रश्न ही चर्चा. खरचं नकळत पाळत आलेल्या अनेक प्रथांबद्दल कधी मनाला प्रश्नच पडले नाहीत. आयुष्यातील अनेक विरोधाभास आयुष्याची खुमारी वाढवतात. त्याकडे टाकलेला हा हलकाच दृष्टिक्षेप, त्यामुळे ह. घ्या.
काय सांगू तुम्हाला,
प्रथा तितक्या व्यथा आहेत !
आणि तुम्हा सांगायला
भरपूर कथा आहेत
संगणकाच्या युगामध्ये
नवसाचा गाडा आहे
नव्या जुन्याच्या संगमाचा
आमच्या देशात राडा आहे
गणपतीला लाल फुलं
शंकराला बेल आहे
वीज आणि पाण्याशिवाय
सारं आलबेल आहे
केरसुणीलासुध्दा आम्ही
लक्ष्मीचं देतो रुप
गृहलक्ष्मीच्या कष्टांचा
रात्रंदिनी जाळतो धूप
सणावारी पंचारती
भाकर-तुकडा ओवाळा
रोज पती घरी येता
तोल त्याचा सांभाळा
सोयर आहे, सुतक आहे
बाळाच्या गाली काळा तीट
आल्या-गेल्याची लागेल नजर
मीठ-मोहऱ्यांनी काढा दीठ
पानामध्ये वाढताना
डाव्या-उजव्याचा असतो मेळ
घराबाहेर मात्र चालते
रस्त्यावरची उघडी भेळ
संगणकामध्ये सुध्दा
पुजेचा प्रोग्राम आहे
श्रध्दा आणि भक्ती असेल
तरच जगण्यात राम आहे !
( परंपराप्रिय ) अभिजित पापळकर