कविते तुजला मी कुठे कुठे शोधावे?
कविते तुजला मी कुठे कुठे शोधावे?
रस्त्यावर काही भगभगणारे दिवे
फुलला गुलमोहर साज लेवुनी नवे
परतून चालले घरी आपुल्या थवे
ह्या सगळ्यांना का नुसते बघत बसावे?
कविते तुजला मी कुठे कुठे शोधावे?
घरभर सैरावैरा फिरणारे वारे
का ढगांत अवघे जाऊन लपले तारे?
मी वाचत नाही सखे नयन तव घारे
मग काय निराळे स्वप्नांना सांगावे?
कविते तुजला मी कुठे कुठे शोधावे?
हे पडदे मळकट,भिंती कळकट झाल्या
अन तंबोऱ्याच्या तारा गंजत आल्या
नाही मित्राची हाक ऐकली - 'साल्या'
मी आठवणींनो तुमचे काय करावे?
कविते तुजला मी कुठे कुठे शोधावे?
सुचतील तश्या मी ओळी खरडत जातो
नेहमी बिचारा कागद वाया जातो
कविता म्हटले की हसतो मजला जो-तो
मी चुकार शब्दांना का सांभाळावे?
कविते तुजला मी कुठे कुठे शोधावे?
-नीलहंस