उत्तरारण-२

           कळ्यांची फ़ुलं व्हायचा एक मोसम असतो.ती वसंतात फ़ुलली तर त्यांची शोभा सृष्टीलाही सजवते. मोहर अकालीसुध्दा येतो पण तो फ़लद्रुप होत नाहि.या निसर्गाच्या लीला आहेत.तुझ्या माझ्या मिलनाची घडी त्याने आधीच लिहून ठेवली होती. याला मृगजळ म्हणू नकोस.तृष्णा शांत व्हायला एक थेंब पण खराखुरा लाभला हे विसरू नकोस. हे अप्रूप जाण. हे सर्वांच्या नशिबात नसतं.त्या थेंबानेच तृप्त होऊन हा सुंदर आविष्कार ज्याने घडविला त्या दात्याचे आपण रूणि होऊ.आपलं एकमेकांचं अस्तित्व या अत्युच्च आनंदाचा एक सुंदर अनुभव आहे.


        तेव्हा डोळ्यातली ही अगतिकता विसरून आपण नव्याने जगूया...आपापल्या क्षितिजावर!' मित्राच्या ' आकर्षक रंगसंगतीत एकरूप होऊन.......अजूनही त्याच्या किरणांत ऊब आहे प्रेमाची! त्याने बहाल केलेले नजराणे काळजाच्या सांदिकोपऱ्यात जपुन ठेव.कन्याकुमारीचा तो सागरतट आजही आपली आठवण काढतोय...ती व्याकुळ संध्याकाळ अजूनही किनाऱ्यावरील मऊशार रेतीत आपली पावलं शोधीत आहे...मरीनड्राईव्हची दिव्यांची माळ अजूनही  आपल्या डोळ्यांच्या कौतुकाचि वाट पहात आहे....मढ आयलंडची रेशमी वाळू आजही तशीच चमकतेय 'मावळत्याच्या' साक्षीनं आपली आठवण काढीत...ती सागराची गाज.... धुंद स्वराची सुरावट नी तीच्या तालावर थिरकण्याऱ्या आपल्या लयबध्द पावलांची चाहूल... देहभान हरपवून टाकणारी.....


           हे सारं इतक्या लवकर विसरु नकोस.हेच तर जगण्याच मर्म आहे.हा कस्तूरीचा गंध आहे.तो मनात भरून घे....दाटून आलेला हुंदका त्यात विरघळून जाऊ देत....ह्या दरवळीत तुझे कासवीशी श्वास मोकळे होऊ देत...भांबावलेल्या तुझ्या डोळ्यातील पाणी सुगंधित होऊ देत...ही व्याकुळता त्या गंधाबरोबर वाहून जाऊ दे....बघ आता आभाळ कसं मोकळं झालंय......तुझ्या माझ्या स्वागतासाठी....


                    चल असे पंखाना फ़ैलावून झेप घेऊ अज्नाताकडे.........


शीला.