तुमच्या-आमच्यासठी कुणी......

आज आम्हा भारतीयांपुढे अनेक गहन प्रश्न उभे आहेत. आमच्या एका महान खेळाडूच्या हाताला झालेली दुखापत, आमच्या एका महानायकाला जडलेल्या व्याधी, एका नवीन गायकाच्या अवास्तव प्रसिद्धीचे राष्ट्रीय संकट, एक ना दोन. पण यावर चर्चा- वाद करायला लागणारा निवांतपणा, निर्धास्तपणा आम्हाला शक्य होतोय कारण, तुमच्या-आमच्यासाठी कुणी......


हाडामासाची तीही माणसे


त्यांनासुद्धा असते मन


सैनिक म्हणून देशासाठी


मग देतात तन-मन



बर्फ, थंडी, वादळवारा


वाळवंटाचा कधी निवारा


देशासाठी वाहती यांच्या


घामाच्या, रक्ताच्या धारा


बायका-पोरं, आई-बाप


चिंता, कधी आजार आहे


कधी तरी येणाऱ्या


पत्राचाच आधार आहे



तुमच्या-आमच्यासाठी असते


फक्त एक सीमारेषा


जीवन आणि मृत्यू सतत


तिथे बोलतात मूक भाषा


हातामध्ये शस्त्र आहे


मनामध्ये निष्ठा सच्ची


ध्येय समोर स्पष्ट होताच


धूसर होतात कच्ची-बच्ची



युध्द फक्त घटना नसते


काळजामधली कळ असते


मृत्यूच्या पाचोळ्यासंगे


घोंघावणारे वादळ असते


कुठे आहे सुखाचा वारा,


कुठे चांदण्यांचे नभ आहे ?


तुमच्या-आमच्यासठी कुणी


सीमेवरती उभं आहे !


                   ( सैनिकांचा ऋणी ) अभिजित पापळकर