माणुसकी - एक अनुभव

(या अनुभवास काय शीर्षक द्यावे कळत नव्हते. तुम्हीच सांगा एखादे.)           

           अडीच वर्षापूर्वीची गोष्ट असेल.आयुष्यातील सर्वात त्रासदायक काळ होता तो.मी वैयक्तिक अडचणींमधून जात होते. अगदी उध्वस्त करून टाकणाऱ्या वादळासारख्या.. मी मुंबईत राहत होते तेंव्हा. मला सोबत म्हणून माझी आईही आली होती थोड्यादिवसांकरता. एके रविवारी आम्ही सिद्धीविनायकाला जायचं ठरवलं.माणूस दु:खात असतानाच देवाच्या जास्त जवळ असतो नाही का? असो.. तर त्यादिवशी दुपारी मी,आई, माझी रूममेट आणि तिचा एक मित्र आम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलो. फारच शांत वाटत होतं तिथे मनाला. थोड्यावेळाने आम्ही परत घरी आलो. त्या दिवशी तसं विशेष काहीच घडलं नाही. कालांतराने माझी ती रूममेट आपल्या गावाला निघून गेली आणि मी सहा महिन्यात अमेरिकेला आले. आणि काळाबरोबरच माझ्या अडचणी पण संपत गेल्या, माझ्या आयुष्याची गाडी रुळावर यायला लागली.पण तो दिवस मला आज चांगलाच लक्षात राहिला कारण... 
           थोड्या दिवसांपूर्वीच माझ्या रूममेटचा तो मित्र मला अमेरिकेत एका ठिकाणी भेटला,एका समारंभात.आता आम्ही काही खास मित्र नव्हतो, फक्त 'हाय-बाय' पुरतेच. प्राथमिक गप्पा झाल्या आणि आम्ही घोळक्यात मिसळून गेलॊ.थोड्यावेळाने आम्ही दोघेच एका ठिकाणी होतो आणि तो मला म्हणाला 'तुला आठवतंय आपण एकदा बरोबर सिद्धिविनायकाला गेलो होतो'. मी म्हणाले हां आठवतंय खरं. तो म्हणाला " मला जास्त काही माहीत नव्हत तुझ्या अडचणी बद्द्ल पण तुझा उदास चेहरा पाहून फार कसंतरी वाटलं होतं. त्यादिवशी मी सिद्धिविनायकाकडे एकच मागितलं. 'देवा, या मुलीची जी काही इच्छा असेल ती पुरी कर'. आज तुला इथे,इतके निवांत, खुशीत पाहून मला खूपच आनंद होतोय. "
           तुम्हीच सांगा मी या मुलाला काय म्हणणार होते? माझे सारे शब्द अपुरे होते. कुणीतरी कुणासाठी निरपेक्ष भावनेने केलेल्या प्रार्थनेला 'माणुसकी' च म्हणता येईल ना? त्यादिवसानंतरही आम्ही फारसे बोललो नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की कळली. अशाच लोकांच्या प्रार्थनेने मला अनेक संकटातून पार पाडलंय.आजही त्याची वाक्यं आठवली की मला देवाचे आभार मानावेसे वाटतात असे लोक माझ्या आजूबाजूला असल्याबद्दल....

 

-अनामिका.