केवढे बोलायचे होते मला
नेमका हुंकार माझा लांबला
हे खरे, मेंदी जरी झाली फिकी
सोडवेना हात पण हातातला
मी जसा साधा तशी ही भेटही
सांजवेळी मोगरा मी आणला
"काळजी का वाटते माझी तुला?"
("वाटते का काळजी माझी तुला?")
छान! हाही प्रश्न आहे चांगला!
मी कुणाच्याही न हाती लागलो
फक्त शब्दांना सुगावा लागला
-नीलहंस