सोड आता!

मला पाहुनी टाळणे सोड आता!
जिवाला असे जाळणे सोड आता!

जगाची कशाला तुला काळजी ही
मिठीतून ओशाळणे सोड आता...

जुने टाळुनी थांबलो सोबतीला
सखे आसवे ढाळणे सोड आता...

तुझा वर्ण लाजून झाला गुलाबी
गुलाबावरी भाळणे सोड आता!!

तुझ्या अंतरी जे मला ते कळाले
तरी मौन सांभाळणे सोड आता!

समोरी मला पाहुनी बोलते ना
अवेळी टिपे गाळणे सोड आता!

अशी स्पंदनांची नको तार छेडू
कथा तीच हाताळणे सोड आता!

तुझा श्वास हा दर्वळे भोवताली
सखे मोगरा माळणे सोड आता!

अता राहिलो ना सखे वेगळाले
स्वतःलाच न्याहाळणे सोड आता!

पुरा जाहला आज 'सारंग' वेडा
असे मंद गंधाळणे सोड आता!