मग लिहीन की कविता..

आवृत्ती १ :


मला जरा सावरू तर दे..
मग लिहीन की कविता..

अजून कुठे रात्र पुरती हरल्ये
अजून कुठे तहान पुरती सरल्ये
अजून एकदा तुला डोळ्यांनी पिऊन घेऊ दे..
मग लिहीन की कविता..

अजून उजाडलेला नाही उद्याचा दिवस
अजून पुरता फिटायचाय बोललेला नवस
अजून एकदा जीव ओवाळून टाकू दे..
मग लिहीन की कविता..

अजून श्वासांत माझ्या तुझे श्वास दरवळतायत
अजून स्पर्शात तुझ्या कोवळी फुलं चुरगळतायत
उद्या श्वासांचे ध्यास उरतील.. स्पर्शांचे नुसतेच भास उरतील..
अजून काही क्षण जगून घेऊ दे..
मग... लिहीन की कविता....


आवृत्ती २ :


मला जरा सावरू तर दे..
मग लिहीन की कविता..

अजून कुठे रात्र पुरती हरली आहे 
अजून कुठे तहान पुरती सरली आहे
अजून एकदा तुला डोळ्यांनी पिऊन घेऊ दे..
मग लिहीन की कविता..

अजून उजाडला नाही आहे उद्याचा दिवस
अजून पुरता फिटावयाचा आहे बोलला होता तो नवस
अजून एकदा जीव ओवाळून टाकू दे..
मग लिहीन की कविता..

अजून श्वासांत माझ्या तुझे श्वास दरवळत आहेत
अजून स्पर्शात तुझ्या कोवळी फुलं चुरगळत आहेत
उद्या श्वासांचे ध्यास उरतील.. स्पर्शांचे नुसतेच भास उरतील..
अजून काही क्षण जगून घेऊ दे..
मग... लिहीन की कविता....


तळटीप : ही कविता वृत्तबद्ध नसल्यामुळे दुसरी आवृत्ती काढणे सहज शक्य झाले. परंतु आवृत्ती १ ही प्रथमावृत्ती होती हे नमूद करावयाला हवे.