ह्यासोबत
खूप वर्षांपूर्वी एक कथा वाचण्यात आली होते. कथेचे नांव, लेखकाचे नांव आता साफ विसरून गेलोय पण गावात वाढल्याने त्या कथेचा विषय चांगलाच लक्षात राहिला. ग्रामीण भागातल्या राजकारणाचा विषय पुस्तकात होता. मनोगतावर आल्यावर ह्या विषयावर काहीतरी लिहावेसे सतत वाटत होते, महाराष्ट्रात स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. ह्या पार्श्वभूमीवरील लेखन आजवर मनोगतावर झालेले नसल्याने आज ही कथा येथे देत आहे. कथा खूप मोठी आहे कारण विषयही तितकाच मोठा आहे.
जिल्हा पंचायत व ग्राम पंचायत ह्या दोन वेगवेगळ्या स्वायत्त संस्था आहेत. ज्या गावांची लोकसंख्या मर्यादित असते तेथे ग्रामपंचायती मार्फत कामे केली जातात. पण जनसंख्येची मर्यादा ओलांडल्यावर तिला जिल्हा पंचायतीचा दर्जा प्राप्त होतो. एका जिल्ह्यात बरेच तालुके असतात. प्रत्येक तालुक्यात गांवे समाविष्ट केलेली असतात. प्रत्येक गांवातून वस्त्या, पाडे इत्यादी उपविभाग पाडले जातात. छोट्या गावांत सरपंच व/वा पोलिस पाटील कारभार बघतो तर थोड्या मोठ्या गांवात ग्रामपंचायती मार्फत कारभार केला जातो. येथे टर्मिनॉलॉजीची (व्याख्येची) सरमिसळ होऊ नये म्हणून हा खुलासा करणे भाग पडत आहे. कथा वाचताना कुठेही व्याख्येची सरमिसळ माझ्या चुकीने झाली असल्यास किंवा वाचक स्वतः: गोंधळल्यास ही टीप जरूर वाचावी...... सर्व खुलासे प्रतिसाद देण्यापूर्वी होतील.
सरकारने स्थापीत केलेल्या सर्व स्वायत्त संस्थांचा शक्य तितका अभ्यास करून ही कथा लिहिली आहे..... कुठे त्रुटी आढळल्यास माझे ज्ञान वृद्धिंगत करणारे प्रतिसाद अवश्य द्यावेत. ह्या संदर्भात इतर मनोगतींचा काही अभ्यास असल्यास जरूर नमूद करावा जेणे करून वाचकांसाठी नेमक्या माहितीचा प्रसार होईल.
ह्या कथेची कल्पना नक्कीच त्या पुस्तकावरून मिळाली. गेले काही महिने ह्यावर लिखाण सुरू होते. कथा ज्या पुस्तकातल्या विषयावर आधारित आहे, त्याचे नांव - लेखकाचे नांव हे आठवत नसल्याने त्याचा उल्लेख करता येत नाही त्याबद्दल खेद आहे परंतु विषयाची कल्पना सोडल्यास बाकी सर्व मेहनत माझी आहे ह्याची खात्री बाळगा.
कथा आवडली तर त्याचे श्रेय त्या अनामिक लेखकाला नक्की द्या....... न आवडल्यास मी कुठेतरी कमी पडलोय असे समजा.
~धन्यवाद~
************************
तेजस्विनी ~ भाग पहिला.
मृगाचा पाऊस आर्द्रात प्रवेश करण्याच्या बेतात असतानाच पेरण्यांना सुरुवात होणार होती. ह्या वर्षी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार होत्या. आषाढातल्या एकादशीची जसा वारकरी आतुरतेने वाट पाहत असतो, अगदी तश्याच ह्या निवडणुकांची गावात वाट पाहिली जायची.
राजाभाऊ जाधवांना ह्या निवडणुकांशी काही देणे घेणे नव्हतेच असे नाही, पण अगदी टोळक्यांत बसून त्यावर चर्चा करण्या इतपत रसही नव्हता. नाही म्हणायला त्यांच्या मावसं काकांच्या, नानासाहेब पाटलांच्या गळ्यात दरवेळे सारखीच अध्यक्ष पदाची माळ पडणार की नाही ह्या बाबत मात्र त्यांना शंका होती.
नानासाहेबांच्या रक्तातच राजकारण होते. येनकेन प्रकारेण गेल्या २५ वर्षांपासून नानांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीवरची मांड सैल पडू दिलेली नव्हती. नानांचा दरारा व वचक गांवात भल्याभल्यांना ठाऊक होता. त्यांच्या वरताण त्यांची दोन्ही मुले होती. 'बाप सें बेटा सवाई' ह्या म्हणीचे उदाहरण देण्यासाठी त्यांचा उपयोग केला जावा इतकी त्यांची ख्याती होती. गांवात भावकीची भांडणे सोडवायला त्यांना बोलावणे गेल्यास दोन्ही पक्ष पस्तावलेच समजायचे ! जमिनीच्या तुकड्यावर कोणा शेतकऱ्याने सावकाराकडून कर्ज घेतल्यास त्याने निमूटपणे व्याज व मुद्दल दिलेलेच बरे... कारण सावकार तर दूरच राहायचा; पाटीलच तो शेतीचा तुकडा सावकाराकडून पडेल किंमतींत उचलून घशांत घालायचे. तक्रार करायची सोयच नव्हती ! जो कोणी पाटील वाड्याकडे वाकड्या नजरेने बघेल त्याची कंबक्तीच भरली समजायची ! नानांची दोन्ही पोरे त्याच्या घरावरून गाढवाचा नांगर फिरवायला कमी करणार नव्हती... वरून घरच्या आया बायांची इज्जत वाड्याच्या वेशीवर टांगली गेली असती ते वेगळेच.
नानासाहेब पाटलांचा मोठा सुहास लांडग्याच्या जातीचा होता.... स्वतःची मुले मोठी असूनही चांगलाच रगेल होता. त्याच्या समोर घरातल्या मोलकरणीही वावरायला टाळत तर धाकटा सुनील कोल्ह्याच्या जातीचा होता. बायको बरोबर मेहुणीलाही त्याने घरात आणलेली होती. लग्नच त्या अटीवर केले असे गांवातले लोकं कुजबुजतं !
हे सर्व कमी की काय तर त्यात भर होती ती त्यांच्या चमच्यांची.... गांवातली काही तरणी पोरे सुनील व सुहासला पाठिंबा देण्याच्या नांवाखाली चांगलीच वाह्यातपणा करीत. सुहासच्या बायकोच्या भावाची, रमेशची त्याला जोड होतीच. अर्थात गांव तेथे उकिरडा असणारच म्हणत जाणती मंडळी ह्या प्रकारांकडे काणाडोळा करीत.
यंदा नानासाहेब पाटील स्वतः: निवडणूक लढवण्याच्या मन:स्थितीत नव्हते. विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.
मोठ्या मुलाला, सुहासला परिषदेचा अध्यक्ष बनवायचा त्यांचा मनसुबा होता.
राजाभाऊ जाधवांना ह्या सर्व प्रकारांशी वैयक्तिक देणे घेणे काहीच नसले तरी लॉ कॉलेजला प्रोफेसर असलेल्या राजाभाऊंना नानांच्या व त्यांच्या मुलांच्या प्रत्येक वर्तणुकीची किळस येई. स्वतः सुशिक्षित, त्यात पत्नी सुविद्य शिक्षिका असल्याने त्यांच्या संस्कारक्षम मनाला कित्येक गोष्टी पटत नसत. सुरुवातीला त्यांनी नानांना समजवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला मग विरोध करण्याचा पण त्यामुळे स्वतःचेच नुकसान होते हे कळल्याने त्यांनी गप्पच बसणे पसंत केले होते. राजाभाऊंच्या पत्नी सुरेखालाही नानासाहेबांच्या घराशी नाते जोडून ठेवणेही वैचारिकपणे विसंगत वाटे. एका शिक्षिकेत असणारे सारे गुण सुरेखाताईंमध्ये होते. मुलांच्या मानसिकतेची त्यांना जाण तर होतीच, पण त्यांना तळमळीने शिकवण्याची वृत्तीही त्यांनी अंगिकारलेली होती. लहानग्या वैशाली बरोबर तिघांचा संसार सुखात होता. जोड देण्यास राजाभाऊंची आई सोबतीला होतीच.
****************************
'जिल्हा सहकारी दूध फेडरेशन संघा'चे संचालक संतोषभाऊ चौधरी नानासाहेब पाटलांचे कट्टर विरोधक. नानांच्या "विकास आघाडी" ह्या पक्षाच्या विरोधातला त्यांचा "जनजागृती" पक्ष चांगलाच संघर्ष देत असे. समितीच्या अध्यक्षाच्या पदास आपण कसे पात्र आहोत हे ते आपल्या समर्थकांकरवी गावकऱ्यां पर्यंत व्यवस्थित पोहचवत होते. ह्यावेळी नानासाहेब पटलांना धूळ चारण्याचा ठाम निर्धार संतोषभाऊंनी केलेला होता.
संतोषभाऊंनी वाणिज्य पदवी घेतल्यावर पुढे व्यवस्थापनात पदवी घेण्यानिमित्ताने परदेशवारी केली होती. वडिलांचे आधिपत्य असलेल्या दूध फेडरेशन संघावर स्वतः:चा ठसा निर्माण करून बिनविरोध वर्चस्व प्रस्थापित केले होते. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांचे ब्रीद वाक्य असे. गावात फक्त राजकारण न करता समाजकारणही रुजवण्यात त्यांचा मोठा हिस्सा होता. राजाभाऊ जाधव प्रोफेसर असलेल्या महाविद्यालयाचे संस्थापक संतोष भाऊच होते. राजकीय सत्तेत प्रवेश मिळाल्याखेरीज मनाजोगता विकास साध्य करता येणार नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक होते व म्हणूनच नानासाहेब पाटलांची राजकीय सद्दी संपवावीच लागणार हे ते जाणून होते.
राजकारण किंवा समाजकारणात सार्वजनिक चारित्र्य स्वच्छ ठेवावेच लागणार अन्यथा त्याचा परिणाम वैयक्तिक, तसेच पुढे जाऊन सामाजिक जीवनावर होईल ह्याची कल्पना त्यांना होतीच. छोट्या गांवात कुठलीही कुलंगडी लपून राहणार नाहीत तेव्हा त्या वाटेला जायचेच नाही अशी पक्की खूणगाठ त्यांनी बांधून ठेवलेली होती. स्वतःच्या आसपास महिला कार्यकर्त्यांचा घोळका असला तरी त्याबरोबर तितकेच पुरूष कार्यकर्ते असायलाच हवेत हा दंडक त्यांनी पाळलेला होता.
बऱ्यापैकी शिकलेली खानदानी घरातली बायको, लॉ कॉलेजला शेवटच्या वर्षात शिकत असलेली कन्या व चौदावीत शिकणारा व 'बिझीनेस मॅनेजमेंटला' प्रवेश मिळण्याची स्वप्ने बघणारा मुलगा हा त्यांचा संसारिक पसारा होता. आजोबा, आजी, आई, वडील, दूरची विधवा आत्या, नोकर गडी तसेच आला-गेला, पै- पाहुणा अशा बयाच मंडळींचा राबता असलेले त्यांचे घर होते. घरची श्रीमंती व शेती वाडी घरात कसलीही कमतरता भासू देत नव्हती. लक्ष्मी बरोबर सरस्वतीनेही वरदहस्त ठेवलेला असल्याने संतोष भाऊंचे नांव सार्थकी लागलेले होते.
मिठ्ठास वाणी, समोरच्या व्यक्तीचे संभाषण पूर्ण झाल्याशिवाय न बोलण्याची सवय, आग्रही व मनमिळाऊ स्वभाव असे कित्येक गुण संतोषभाऊंनी प्रयत्नपूर्वक आत्मसात केले होते. व्यवस्थापनात घेतलेली पदवी आचरणात आणण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे होते.
राजाभाऊ जाधवांवर त्यांचा खास लोभ होता. प्रियाचे लाडके शिक्षक, चांगला शिकलेला गुणी माणूस व गरीब परंतू स्वकष्टावर वर आलेल्या ह्या प्राध्यापकाबद्दल त्यांना नितांत आदर होता. राजाभाऊंचाही संतोषभाऊंवर खास लोभ होता. इतर सर्व गावकरी त्यांचा संतोषभाऊ नावाने उल्लेख करीत, एकटे राजाभाऊ त्यांना "सर" म्हणत.
जमीन अस्मानाचा फरक असलेले हे गांवातले दोन मोठे राजकारणी एकमेकांना पुरते जोखून होते. व म्हणूनच की काय त्यांचे समर्थकही कधी आपापसांत लढत नसत. दोघांच्याही मनांत एकमेकांबद्दल सुप्त अढी होती, तरीही वरकरणी त्यांची समोरासमोर कधी जुंपली नाही. गांवातले वातावरण तणावमुक्त ह्या मुळेच राहिलेले होते.
यंदाच्या निवडणुकांमध्ये चित्र वेगळे असेल व नानासाहेब पाटील व संतोषभाऊ चौधरी एकमेकांसमोर उभे ठाकणार असे लोकं कुजबुजायला लागले होते.
***********************
स्वर्गीय राजीव गांधींनी राजकारणात सुरू केलेल्या स्थानीय स्वराज्य संस्थांत महिला आरक्षण पद्धतीचा फायदा ह्या वेळी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत स्त्रियांना देण्यात येणार असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा जी.आर. परिषदेच्या सचिव साहेबांच्या टेबलावर पडला आणि परिषदेच्या समितीवर जणू काही वीजच पडली !
"च्यामारी आता बाया समितीच्या अध्यक्षा व्हनार की काय रं गड्या ?" पाटलांच्या पोराच्या, सुहासच्या तोंडातून हे वाक्य पडताच सचिवांच्या कार्यालयातल्या कारकुनाने फक्त मान हालवली.
सुहासच्या बथ्थड डोक्यात तो हो बोलतोय की नाही ते शिरलेच नाही.
"**ला तुझ्या, तोंडानं सांग की रं व्हय म्हनतोय की न्हाय त्ये"
"साहेबांना विचारून उद्या कळवतो" कारकून मोकाशीने उत्तर दिले.
"**च्या, मग मुंडी कश्यापायी हालवतूस ?" सुहासचा जळफळाट होत होता.
न जाणो हे दिवटं उद्या परिषदेचा अध्यक्ष झालं तर डोक्यावर मिऱ्या वाटेल म्हणून मोकाशी गप्प बसला.
"नानासाहेबांनीबी ह्यो कसलं लचांड तुमच्या मागे लावलंय, अध्यक्ष बनवायचं ?" सुहासचा मेहुणा, रमेश सावली सारखा त्याच्या बरोबर राही. अगदी तमाशाच्या फडातल्या नायकिणीशी ओळख करायच्या वेळीही तो मागे राहत नसे.
"त्यांस्नी विधानसभेवर जायच हाय आता, गांवात आपलं राज्य आलं पाहिजे रमेश"
"जाऊ द्या हो सुहास राव, कश्यापायी नाराज व्हताय, असा रूल आला तरीबी बायकोला पुढं करून आपणच राज्य चालवायचं की त्या लालू प्रसाद सारखं " खुसखुशीत हसत फेगडे म्हणाले. यावल तालुक्यातले फेगडे कुटुंबीय वर्षांपासून नानांना अध्यक्षपदाच्या निवडणुकांत तालुक्यातल्या समितीची मते मिळवून देत.
"आपल्या समाजातल्या बायका डोईवरचा पदर खाली पडू द्येत न्हाईत तर अध्यक्षीण कश्या बनतील" सुहासला काळजी आपल्या खुर्चीची लागलेली होती. बोलता बोलता तो खुर्चीवरून उठला त्याच्या पाठोपाठ त्याचे दोघे चमचे लगबगीने उठले. मोकाशी ऐकल्या न ऐकल्या सारखे करीत डोकं एका रजिस्टरांत खुपसून बसला होता.
"मोकाश्या, ते मोरीच्या बांधकामाचे टेंडर कधी पास करतुयस ?"
"आता आचार संहिता लागू झाली सुहासराव, टेंडर बारगळलं !"
"**ला ह्या संहितेच्या, ह्या ***च्याला कधीचा बोंबलतोय, टेंडर पास कर म्हणून" सुहासचा चेहरा लालबुंद झालेला होता. "**व्या टेंडर हातातलं गेलं तर तुला दावतो पाटलाचा हिसका"
"भ"ची बाराखडी उगाळत सुहास खोलीच्या बाहेर पडायला वळला तोच त्याची नजर दारांत उभ्या असलेल्या संतोषभाऊंवर पडली. एक क्षण काय बोलावे ते त्याला सुचेना. कसंबसं 'कसे आहात' असा प्रश्न टाकत तो चमच्यांसह तेथून सटकला. संतोषभाऊंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य का उमटले त्याचाच त्याला प्रश्न पडला होता.
"राजपुत्राचा आज श्लोक पठणाचा वार होता का मोकाशी ?" सुहास गेल्या दिशेला बघत त्यांनी हसत हसत मोकाशींना विचारले
"जाऊ द्या हो संतोषभाऊ आम्हाला हे रोजचेच आहे. कार्यालयात बाई माणूस कर्मचारी असूनही ह्यांची ही असली भाषा ऐकून घ्यावी लागते. आता तुम्हीच काय करता येईल तर पाहा "
"अहो, असे नाराज नका होऊ मोकाशी, हे कुत्रं जास्त भुंकू नाही शकणार आता."
" काय सांगू संतोष भाऊ.... आता तेहतीस टक्के जागांवर महिलांना आरक्षण द्यायचा निर्णय सरकारचा, मिरची लागली ह्यांना..... त्यात भरडले आम्ही जातोय" मोकाशींच्या तोंडून खरे कारण बाहेर पडले.
"मरू द्या, मोकाशी आमच्या वसतिगृहाच्या परवानगीचे पत्र पोहचले. त्याबद्दल व्यक्तिशः: धन्यवाद देण्यासाठी आलोय मी खासं"
लॉ कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी गाव-तालुक्यातून मुली येत. त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून संतोषभाऊंनी वसतिगृहाच्या कच्च्या आराखड्यासह परवानगी मागणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. त्यात मोकाशींनी त्यांना खूप मदत केली होती.
"काय हे संतोषभाऊ, अहो साधा फोन केला असतात तरी चाललं असते, आपण उगीच तसदी घेतलीत" मोकाशीच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव तरळले.
"असं कसं चालेल, मग आमच्या पुढच्या कामाच्या वेळी तुम्हाला वाटेल 'बघा, संतोषभाऊ मोठी माणसं झालीत, आता भेटायलाही येत न्हाईत." हसत हसत खुर्चीवरून उठत ते म्हणाले.
"भाऊ, बसा नं, चहा मागवतो" मोकाशी लगबगीने उठले. "नको, त्यापेक्षा तुम्हीच कधी बंगल्यावर या सकाळच्याला, चहा नाश्ता जोडीनच घेऊ....." म्हणत ते दाराकडे वळले.
"महिला आरक्षणाच काय म्हणालात तुम्ही मोकाशी ?" सहज खडा टाकावा तसे संतोषभाऊ बोलले.
"ह्या वेळेचे नक्की माहीत नाही" मोकाशी खाजगीत बोलल्यासारखे बोलले. "पण तेहतीस टक्के जागांवर महिला उमेदवार येणार हे नक्कीच, तसा जी आर काढलाय जिल्हाधिकायांनी. अध्यक्षांच्या पदासाठी काय करायचे त्याबद्दल मीटिंग आहे जळगांवला, तेथेच गेलेत आमचे साहेब"
"बरंय, स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटेल आता, व पाटलांची वाचा त्यांच्या ताब्यात राहील." हसत हसत ते बाहेर पडले तेव्हा 'किती साधा माणूस आहे' हा विचार मोकाशींच्या डोक्यात आला.
******************
सुरेखाताईंना दारांत उभे असलेले बघून राजाभाऊ जाधवांना आश्चर्य वाटले. स्कूटर स्टॅंडवर लावत त्यांनी विचारले, "काय हो, काय झालं ?"
"आल्या आल्या बंगल्यावर पाठवा, चहा व रात्रीचे जेवण आम्ही बंगल्यावरच घेऊ असा निरोप धाडलाय संतोषभाऊंनी"
"बरं, हात पाय धुऊन जरा फ्रेश होऊन मग जातो... तोवर तुम्ही चहा पाजा घोटभर आम्हाला" राजाभाऊ घरांत शिरत बोलले.
"अहो, उशीर होईल नं" "आता अंमळ दहा मीनीट उशीरानंच आलो असतो तर?" ह्या राजाभाऊंच्या प्रश्नाला त्यांच्या कडे उत्तर नव्हते.
बंगल्यावर वासूभाऊ, इंदूताई भराडे, शेळके गुरुजी, देसाई साहेब, प्रा. फिरके वगैरे मंडळी बघून राजाभाऊ बुचकळ्यांत पडले. वेगळेच काही तरी प्रकरण दिसतेय हा विचार मनांत आणत व सर्वांना यथायोग्य अभिवादन करीत ते एका खुर्चीत बसले. सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळल्यात हे बघून जरा ओशाळल्यागत होत ते म्हणाले "उशीर झाल्याबद्दल माफी मागतो, सर"
"त्यात काय माफी मागता राजाभाऊ, सगळे आत्ताच आलेत." ह्या संतोषभाऊंच्या वाक्याने त्यांचा जीव भांड्यात पडला.
घसा खाकरतं त्यांनी राजाभाऊंकडे बघत बैठकीला सुरुवात केली..... "आज झेड पी च्या कार्यालयातल्या मोकाशीची भेट घेण्यास गेलो होतो......" त्यांनी महिला आरक्षण विधेयकाचा विषय सर्वांसमोर मांडला.
राजाभाऊंना महिला आरक्षण विधेयकाबद्दल बरेच काही माहीत होते. लॉ कॉलेजचे प्राध्यापक असल्याने तो त्यांचा शिकवण्याचा विषयही होता. संतोषभाऊंचा आपल्यावर लोभ आहे ह्याची जाण त्यांना होती पण ह्या राजकीय निवडणुकांच्या बैठकीत आपले नेमके स्थान कोणते ह्याबद्दल त्यांना अंदाज येत नव्हता.
"कसला विचार करताय राजाभाऊ ?" सरांच्या बोलण्याने एकदम ते भानावर आले.
"मला ह्या विधेयका बद्दल पूर्णं माहिती आहे. सध्या सरकारने फक्त सदस्यांसाठी हे विधायक लागू केले आहे परंतू येत्या पाचं वर्षांत समितीच्या कार्यकारणीवरही ते लागू होईल असा आम्हा विश्लेषकांचा अंदाज आहे." राजाभाऊ शांतपणे बोलत होते, संतोषभाऊंची कौतुकाने भरलेली नजर आता त्यांना सवयीची झालेली होती.
"हो, मोकाशीही तेच बोलत होते. ह्यावेळी तेहतीस टक्के जागा महिलांसाठी राखीव म्हणून ठेवण्यात येणार आहेत. मात्र त्यांना कार्यकारणी सदस्य किंवा अध्यक्षपदाबद्दल काहीही कल्पना नाही."
"साहजिक आहे... कारण, सरकारने तसे स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. ह्या वर्षी हे विधेयक कदाचित प्रयोगाखातीर आणण्यात येईल असा आमचा होरा आहे." राजाभाऊंनी नेमकी परिस्थिती सांगितली. "ह्या विधेयकाला मिळणारा प्रतिसाद व त्याचे येणारे रिझर्ल्ट्स ह्यावरच बाकी सर्व अवलंबून आहे. अत्यंत घाईघाईत हे विधेयक सरकारने सभागृहासमोर मांडून गेल्या अधिवेशनात पास करून घेतले आहे." राजाभाऊंना आपल्याला ह्या बैठकीत का बोलावण्यात आले असावे ह्याचा हळूहळू अंदाज येत होता.
"संतोषभाऊ असे घडले तर आपणांस समितीच्या अध्यक्षपदासाठी उभे राहावे की नाही हे ठरवावे लागणार आहे." देसाई साहेब म्हणाले. देसाई हे जिल्ह्यातले प्रथम आय ए एस अधिकारी होते. मराठी आय ए एस बरेच होऊन गेले पण जळगावांतले आय ए एस म्हणून देसाईंचे नांव सर्वप्रथम होते. संतोषभाऊ चौधरींच्या कारकीर्तीद त्यांनी मिळवलेल्या माणसांपैकी देसाईंचा नंबर बराच वरचा होता. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून जळगाव जिल्हा दूध फेडरेशन संघाचे सुकाणू त्यांनी सांभाळले होते.
"असे कसे म्हणता देसायी साहेब ? आता भाऊंना कोण विरोध करतूय त्येच पाह्याचय मलाबी " इंदूताई भराडे आक्रमकतेबद्दल व शीघ्रकोपी पणाबद्दल तालुक्यात प्रसिद्ध होत्या. पण हाडाची कार्यकर्ती, मेहनती व झोपडपट्टी वासीयांची कैवारी म्हणूनही त्या प्रसिद्ध होत्या. इंदूताई मूळच्या "विकास आघाडी" पक्षातल्या पण सुहासची मर्जी फिरल्याने त्यांना पक्ष बदलावा लागला होता. इंदूताई म्हणत, 'त्या मेल्याची नजर वाईट आहे' तर सुहासचे चमचे म्हणत, 'सुहासचे मन भरले होते' त्यांनी पक्ष सोडल्यानंतर दोघेही एकमेकांसमोर कधीही आले नव्हते म्हणून सत्य गुलदस्त्यातच होते.
"इंदूताई, प्रश्न विरोधाचा न्हाई, सरकारच्या निर्णयाचा हाय" शेळके मास्तर भीत भीत बोलले.
"बरोबर आहे मास्तर, सरकारचा निर्णय बंधनकारक तर आहेच पण तो आपण सर्वांनी योग्य वेळी स्वीकारल्यास विरोधकांवर व्यवस्थित बाजी मारता येईल." संतोषभाऊंनी मध्यस्थी केली. "आजचे मरण उद्यावर ढकलण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा डोळसपणे स्वीकार करावा म्हणून ही खास समर्थकांची बैठक मी बोलावली आहे. मंडळी, आपण जो विचार कराल तो येथे उस्फुर्तपणे मांडा त्यातून काही उपाय निश्चित निघेल असे मला वाटते." संतोषभाऊंनी त्यांचे मनोगत मांडले.
बऱ्याचं चर्चाचर्वणानंतर व जर तर च्या कहाण्यांना अनेक फाटे फोडत जेवणाची वेळ जवळ आल्यावर चर्चा संपुष्टात आली.
मालती वहिनींच्या हातच्या सामिष भोजनाचा व प्रियाशी सध्याच्या कायदेविषयक चर्चेचा आनंद घेत राजाभाऊंनी जेवण उरकले. वहिनींचा व इतर सर्वांचा निरोप घेऊन ते दरवाज्यापर्यंत पोहचलेच होते इतक्यात "राजाभाऊ उद्या कार्यालयात भेटा" असा आग्रहवजा आदेश संतोषभाऊंनी त्यांना दिला. "हो सर नक्की" इतकेच बोलत व जिभेवरची बडीशोपेची चव चाखत त्यांनी सरांचा निरोप घेतला.
~पुढील भाग लवकरच येत आहे.~
****************