कौतूक सर्वांनाच ज्यांचे त्यांस अलगद टाळ तू
तरुतळी पडल्या अकाली त्या कळ्यांसी माळ तू.
असतील त्यांची कारणे जे धावती मोकाटसे
घातलेली वेग-मर्यादा तुझी रे पाळ तू.
कैक बाबा अन गुरुंचे कळप बघ फोफावले
वांछिसी जर मूळ-रुपा, वेद-गीता चाळ तू.
वाढता अपुला पसारा वहिम काही वाढती
तू नको विसरू कदापि, वडिलधाऱ्यां बाळ तू.
ज्यांना जसे जे आवडे तू वाग त्यांच्याशी तसा
ग्राहकाची संस्कृती नात्यांतही सांभाळ तू.
या जगाचे दुःख आहे नेहमीचे, का रडा?
मीट डोळे अन स्वतःवर दोन अश्रू ढाळ तू.
अंधारले चोहिकडे अन वाट चुकली पाऊले
येईल रे कोणीतरी बघ पेटवूनी जाळ तू.