मला माहिती आहे, हे 'भव्यदिव्य' शीर्षक वाचून तुम्ही 'अरे वा, अनु चित्रं पण काढते वाटतं?' म्हणून उत्सुकतेने हा लेख वाचायला घेणार. (म्हणूनच हे शीर्षक दिलं! हॅ हॅ हॅ!) पण माझं नातं जडलं आहे ते चित्रांच्या रंगांशी नाही, तर कपड्यांच्या रंगांशी.
सातवीत असताना आमच्या शाळेचा गणवेष बदलला.म्हणजे, पूर्ण नाही बदलला, वरच्या गडद निळ्या बाहीरहित झग्याच्या आत घालण्याच्या शर्टाचा रंग पांढरा होता, तो पुढच्या आठवड्यापासून आकाशी झाला. माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं, 'अगं आपली पांढऱ्या कपड्यांना घालायची नीळ असते ना, ती जास्त घालून शर्ट त्यात बुडवून ठेवायचा. आपोआप आकाशी होतो.' दुसऱ्या दिवशी न्हाणीघरात माझा प्रयोग सुरु झाला. ते चौकोनी पाकिट मिळतं ना नीळीचं, ते ओतलं आणि भिजवला शर्ट.
पिकासोच्या थोबाडीत मारेल, असं जबरी ऍबस्ट्रॅक्ट निळं रंगकाम झालं होतं शर्टावर. निळाशार, आकाशी, फिका आकाशी, अगदी फिका आकाशी अशा सर्व छटा त्या बिचाऱ्या सदऱ्यावर एकवटल्या. शिवाय निळीची बोटं भिंतीला लागून भिंतीवर अगम्य लिप्या उमटल्या त्या वेगळ्याच. मातेने नुकतंच बालमानसशात्राचं एक पुस्तक वाचलेलं असल्याने तिने प्रचंड सहिष्णुतेने तो निळा पसारा परत पांढरा केला. नाहीतरी 'कार्टी जरा जास्तच प्रयोगशील आहे. अगदी तिच्या बाबांवर गेली आहे' हे आईचं मनातलं मत होतं. कुंडीतल्या झाडाला पाण्याऐवजी बर्फ टाकणे, बाहुलीचे केस कापून ते वाढावे म्हणून तिच्या डोक्याला महाभृंगराज तेल लावणे, गरम वाफाळता चहा स्ट्रॉने पिणे,नवी वही केल्यावर 'जुनी वही आता चांगली दिसत नाही' म्हणून जुन्या वहीतलं सर्व लिखाण परत नवीन वहीत उतरवणे इ.इ. माझ्या पराक्रमांचा अनुभव तिला होताच.
पुढे अकरावीत गेल्यावर गणवेषाच्या पांढऱ्या शर्टावर प्रयोगशाळेत काहीतरी सांडलं. पांढऱ्या शर्टावर एक पिवळट डाग पडला. तो जाईनाच कशानेही. म्हणून काही दिवस त्याला पांढऱ्या खडूने रंगवून पाहिला. तितक्यात आमच्या इमारतीत 'फॅब्रिक पेंटींग' च्या नवीन लाटेत घरात आलेले रंग मिळाले. योग्य तो पांढरा रंग शोधून त्या डागावर लावला आणि 'दाग? ढुंढते रह जाओगे!' झालं. पण दुसऱ्या दिवशी इस्त्री करताना त्या डागाने आत्मार्पण करुन स्वत:बरोबर खालच्या कापडाला सुद्धा नेलं. चक्क गोल डागाच्या ऐवजी गोल छिद्र.
पुढे महाविद्यालयात गेल्यावर गणवेष नाही म्हणून मी खूष. वसतिगृहात असताना एकदा केसांना मेंदी लावली. मैत्रिणीशी गप्पा मारत असताना जाणवलं की मागे वाळत घातलेला श्रीलंकन मुलीचा पांढराशुभ्र टीशर्ट पण मेंदीची खूण अंगावर बाळगून आहे. वेळीच कळल्यामुळे तो धुतला आणि रंग गेला.
पण दुसऱ्या वसतिगृहात गेल्यावर रंगाशी माझं नातं जास्तच घट्ट होत गेलं. एकदा निरोप आला की हिमानी नावाच्या 'लय डेंजर रॅगिंग मास्टर' मुलीने मला खोलीत बोलावलंय. गेले. तिने मला दोरीपाशी नेलं.
'अनु, ये क्या है?'
'आपका टीशर्ट, दीदी.' (आम्ही नवागत असल्याने ज्येष्ठ मुलींना 'दिदी' आणि ज्येष्ठ मुलांना 'भैया/सर'(ज्याला जे चालेल ते) म्हणावे लागे.)
'उसपर क्या है?'
'रंग.'
'किसका है?'
'मेरे ड्रेसका.'
'गुड. अभी के अभी धोकर निकालो, अगर नही निकला तो मुझे बिलकुल ऐसा नया टीशर्ट लाकर दो.'
बादली आणि साबण घेऊन आमची स्वारी न्हाणीघरात. 'व्हाय मी?' हे असे घोर दैवदुर्विलास माझ्याच वाट्याला का यावे? नारींगी रंगाचा तो कपडा मुद्दाम वेगळा भिजवून वेगळा धुतला, तर वाऱ्याने उडून त्याचा रंग शेजारच्या दोरीवरच्या पांढऱ्याभडक(म्हणजे, पांढऱ्याशुभ्र हो! जर इतर रंगाना 'भडक' ही पदवी द्यायची तर पांढऱ्या रंगातील जास्त्तीत जास्त शुभ्र छटेला 'पांढराभडक' म्हणायला हरकत काय आहे?) टीशर्टालाच लागावा?? आणि तोही हिमानीचा टीशर्ट?
स्टोव्हचे रॉकेल, साबण, १०० रु. किलोवाला 'लय भारी' साबणचुरा सगळं लावून पाहिलं. पण नारींगी रंग काही त्या टीशर्टाला सोडेचना. 'नवीन घेऊन देऊ' म्हणून मी खिसापाकीट चाचपायला जाणार तितक्यात शेजारी ठेवलेली 'मेडीक्लोर' ची बाटली दिसली. पाणी शुद्ध करण्यासाठी नुकत्याच माझ्या खोलीसाथिदारीणीने नवी नवी बाटली आणली होती. मेडीक्लोरचे तीन थेंब पाणी शुद्ध करायला पुरत असतील, पण त्या शर्टावर पसरलेले डाग काढायला मला अख्खी बाटली लागली! 'नव्या शर्टाचं एका बाटलीवर निभावलं' म्हणून बाटली पुन्हा विकत आणली. यावेळी रंगांशी असलेलं माझं घट्ट नातं बघून मी स्वत: साठी एक जादा बाटली आणून ठेवली होती.
एका सहलीला माझ्या परममैत्रिणीने हौसेने घालायला तिचा पांढराशुभ्र आणि वर विटकरी लोगो असलेला टीशर्ट दिला. तिला मी तो धुवून परत देणार होते. 'यावेळी रंग लावायचा नाही, नाही, नाही, नाही' असं घोकत मी तो काळजीपूर्वक धुतला. आसपास काही पांढरं वस्त्र वाळत न घातलेली एक एकांतातली दोरी निवडली. शर्ट पिळून निथळायला नळावर ठेवला होता तो घ्यायला गेले आणि .. हाय दैवा! नळावर एका रंगाऱ्याने हातपाय धुतले होते तेव्हा नळाला लागलेला निळा रंग आता अतिव प्रेमाने पांढऱ्या टीशर्टाला चिकटला होता! यावेळी 'मेडीक्लोर है ना..' असं म्हणून मी निवांतपणे तो परत धुवायला घेतला. पण मेडीक्लोरचा रंग काढायचा गुण शर्टावरील विटकरी लोगोला चांगलाच नडला. मैत्रीण 'जाऊ दे गं, त्यात काय??' म्हणून सोडून देण्याइतकी चांगली मैत्रीण होती आणि आजही आहे, पण त्या विटलेल्या विटकरी लोगोने माझ्या हृदयावर केलेली जखम आजतागायत तशीच आहे. (हे असं काहीतरी उदात्त भावनाप्रधान वाक्य अधूनमधून टाकायचं असतं म्हणे बालपणीच्या आठवणीत.)
अशा एका परीक्षेनंतरच्या सुट्टीत आमच्या घरी बाटीक व बांधणीची लाट आली होती. रंग उत्साहाने आणले होते.यावेळी मात्र रंगाशी जडलेलं नातं मी घट्ट केलं. फॅशन रस्त्यावरुन चाळीस रुपयात आणलेल्या शर्टाचा बळी देऊन त्याचा रंग आकाशीचा गडद हिरवा केला. 'हेय! समथिंग डिफरंट अबाउट धिस शेड!' या मैत्रीणमंडळीच्या चाणाक्ष नजरेला 'फॅशन स्ट्रीटचा आहे' हे नरो वा कुंजरो वा उत्तर देऊन टाळलं.माझा कपड्याचा चॉइस 'जरा घाटी टाइप्स'(आता सुधारला आहे हो मी!) असतो असे त्यांचे वादातीत मत असल्याने विषय आणि पुढे गेला नाही.
'कुछ कुछ होता है' चित्रपटानंतर पांढऱ्याशुभ्र सलवार कुडत्यावर लाल बांधणीची ओढणी ही नवीन फॅशनलाट आली. यावेळी मी सावध होते. नळ तपासला, कपडे वेगळे धुतले, काळजीपूर्वक वेगळ्या दोरीवर वाळत घातले. पण नियती इथेही खदखदून हसत होती!! (उदात्त वाक्य-२). आमच्या वरच्या बिऱ्हाडातल्या यंडुगुंडू बाईच्या लहान मुलीच्या वाळत घातलेल्या परकर पोलक्याचा रंग टपकून बरोबर पांढऱ्या कुर्त्यावर पडला. आता मी सावध होऊन पांढरेशुभ्र कपडे विकत घेणे आणि पांढरेशुभ्र कपडे वापरणाऱ्यांची संगत शक्यतो टाळली.
लग्न झाल्यावर कपडे भिजत घातलेले असताना आपला गडद पोशाख बाजूला वेगळा ठेवला. पण काही परोपकारी कुटुंबघटकांनी 'विसरली असेल घाईत' म्हणून तो परत टबात टाकला. 'रंगाख्यान' मागील पानावरुन पुढे चालू!! समस्त पुरुषमंडळींच्या पांढऱ्याशुभ्र बनियानला निळा रंग! पुन:श्च मेडीक्लोर..
हल्ली मी गडद/फिकट रंगाचे कपडे धुवायला टाकताना स्वत:ला खालील प्रश्न विचारुन मगच धुते:
१. बादलीत इतर कोणाचा पांढरा कपडा आहे का?
२. बादलीत इतर कोणाचा गडद कपडा आहे का?
३. नळाला काही लागलं आहे का?
४. कामवालीच्या ओल्या साडीचा रंग जाऊन कपड्याला लागण्याची शक्यता आहे का?
५. वरच्या मजल्यावरील मंडळींनी आज काय वाळत टाकले आहे?
७. 'कपड्याचा रंग जाणार नाही' अशी १००% खात्री असलेल्या कपड्यावरच्या विणकामाचा रंग जाईल का?
८. मेडीक्लोर जवळच्या दुकानात उपलब्ध आहे का?
पण तरीही एखादी दुचाकीवरुन पांढरेशुभ्र कपडे घालून चाललेली सुंदर ललना पाहिली की मन परत कळवळतं..परत एकदा दुकानातला पांढराशुभ्र पोशाख हौसेने घेतला जातो.. आणि रंगांशी जडलेलं माझं नातं परत कधीतरी घट्ट होतं!
-अनुराधा कुलकर्णी