विराट लाटा, अशांत सागर होता
तुझा तिथे पण अरूप वावर होता
तुझ्याच हातात सोपली मी नौका
पुढील सारा प्रवास धूसर होता
कशास बुजगावणे, कशाला गोफण ?
तुझा शिवारी अखंड जागर होता
घडेल मीलन कधी तुझे ना जाणे
विलीन होण्यात देह अडसर होता
उरेल इतकीच फक्त ओळख मागे
असाच कोणी चुकार शायर होता