इन्स्पेक्शन

मधली सुट्टी व्हायची वेळ जवळ येत होती आणि तिच्या पोटातले कावळे अजूनच ओरडायला लागले होते. मराठीची कसलीतरी कविता जोशीबाईंनी शिकवली होती. शेजारच्या 'ब' तुकडीतून भोसले बाईंचा आवाज इकडेही ऎकू येत होता. त्या भोसले बाईंपेक्षा आपल्या जोशीबाई बऱ्या म्हणायच्या. चौथी 'अ' चा हा वर्ग होता, दुपार होत आल्याने मुलांची चुळबूळ वाढलीच होती. मग कुणाला नं १ ला जायचे होते तर कुणाला तहान लागली होती. कुणी शेजाऱ्याला आपण डब्यात काय आणलंय हे सांगत होतं तर कोणी पेंगत होतं. अशातच शिपाई एक सूचना घेऊन वर्गात आला आणि सर्व एकदम शांत झाले. शिपाई आला की कधी कधी शाळा लवकरही सुटते हा अनुभव आल्यामुळे ही शांतता.

बाईंनी सूचना वाचून दाखवली.आज दुपारी कसलेसे अधिकारी 'इन्स्पेक्शन' ला येणार होते.ते सर्व वर्गांचे निरीक्षण करणार होते.सर्वांना शांत बसण्याची सख्त ताकीद दिली होती. साहेबांनी काही विचारलं तर नीट उत्तरं द्यायची,आपापसात बोलायचं नाही अशा इतर सूचनाही त्यात होत्याच. जी मुले गणवेश न घालता आली होती त्यांना सुट्टीत घरी जाऊन गणवेश घालून यायला सांगितले होते. आणि सर्व वर्गांचे निरीक्षण झाल्यानंतर चार वाजता सर्वांनी 'गणेश' सभागृहात जमायचे होते. सूचना संपेपर्यंत सुट्टी झाली होती. सगळी मुले डबे घेऊन शाळेच्या प्रांगणात पळाली होती. तिला मात्र आज एक वेगळीच चिंता होती. एकतर शाळेच्या गणवेशात पांढरा पोलका आणि त्यावर निळा पेटीकोट घालायचा असायचा. पण असेही त्या पोलक्याच्या फक्त बाह्याच दिसणार असतील तर एव्हढे कापड कशाला वाया घालवायचे असा विचार करून तिच्या आईने पेटीकोटलाच पांढऱ्या बाह्या लावून शिवलेला. त्या गणवेशावरून आधीच तिला सर्वांपेक्षा वेगळं वाटायचं आणि त्यात तो विरलेला बाहीचा कोपरा. काही मुलांना बाईंनी गणवेश नव्हता म्हणून घरी पाठवलं होतं. मलाही त्या साहेबांनी बाहेर काढलं तर? तिला आपल्या गणवेशाचा तो फाटलेला तुकडाच दिसत होता. तिला काय माहीत की हे साहेब येऊन काय पाहणार आहेत ते?
मग तिला आठवलं की तिचा एक जुना गणवेश घरी होता.पण तो तर तिला लहान होतो म्हणून ठेवून दिला होता. बरं तो घालायला घरी जायला घरही बरंच दूर होतं. रोज सकाळी ती शेजारच्या दादाबरोबर येत असे आणि जातानाही. शेवटी वर्गातून बाहेर काढायच्या भितीने तिने घरी जायचं ठरवलं.तिचा डबा तसाच राहिला होता....दुपारी असं मुलीला एकटी घरी आलेली पाहून निर्मला घाबरली. तिने सगळं ठीक आहे ना विचारलं. मग तिचं कारण ऎकल्यावर निर्मलाला कसंसंच झालं.
तिने मुलीला समजावलं,"अगं तू गणवेश घातलाच आहेस ना? मग तुला कोणी काही बोलणार नाही." तरीही ती ऎकत नाहीये म्हटल्यावर तिने जुना गणवेश काढून दाखवला.
"बघ किती लहान आहे तो. बरं ठीक आहे तुझा हाच गणवेश दे, मी त्याची बाही शिवून देते."
निर्मलाने मुलीची समजूत काढण्यासाठी एक ठिगळ कसंबसं शिवून दिलं आणि दोन घास खाऊ घालून शाळेत पाठवलं. ती शाळेत पोचली तोपर्यंत मधली सुट्टी संपली होती. धावत-पळत ती वर्गात शिरली.बाईंनी एक रागाचा कटाक्ष टाकून तिला आत घेतलं. साहेब येणारच होते. तिला जरा बरं वाटलं की अजून साहेब वर्गात आले नाहीयेत. थोड्या वेळात साहेब आले, त्यांनी बाईंशीच चार गोष्टी केल्या,वर्गातले तक्ते पाहिले आणि त्यांना आवडलेही. मग ते लगेचच निघून गेले. तिला एकार्थी बरंच वाटलं होतं की आपल्या गणवेशाबद्दल कुणी काही बोललं नाही.
चार वाजता मग सर्वांना सभागृहात बोलावलं होतं. आज म्हणे पहिले आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळणार होती आणि गरजूंना पुस्तके,कपडे(गणवेशही) देण्यात येणार होते. आता ती जरा आरामात होती आणि त्यात वर्गात बसून अभ्यास करावा लागणार नव्हता आज तरी. समारंभ सुरू झाला. बक्षिसे वाटून झाली आणि एकेक करून गरजूंना पुस्तके-वह्या,कपडे वाटणे चालू होते.तिला वाटत होते, आपल्यालाही असेच सर्व नवीन मिळाले तर किती बरं होईल. तिचीच एक मैत्रीण पण त्यात होती. पण तिला तर त्यांची गरज नव्हती, मग तिचे नाव कसे पुकारले त्यांनी? अर्चना तिची मैत्रीण असली तरी तिचा फार हेवा वाटत असे. तिचे कपडे,छान दप्तर, रंगीत पेन्सिली, सगळ्याचाच. तिचे बाबा तर डॉक्टर होते.तिला काय गरज होती या सर्वांची? मग थोडासा हिरमुसला चेहरा करूनच ती घरी आली होती.आजचा दिवस फारच दगदगीचा आणि निराश करणारा होता. आईने विषय काढल्यावर शेवटी तिने आपल्या मनातलं सांगितलं.
ती म्हणाली,'आई, गरजू म्हणजे काय गं?'
निर्मला, '"अगं, गरजू म्हणजे......" समजावणं फारच कठीण होतं.
"समज, एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल,अगदी महत्त्वाची,उदा. आपल्या शेजारचा तो मुलगा आहे ना, बघ, ज्याचे बाबा शेतात कामाला जातात. त्याची आईही किती काम करून पैसे जमवते.पण मुलांच्या शाळेसाठी,वह्यांसाठी पैसे त्यांना पुरतच नाहीत. पण शिक्षण तर महत्त्वाचं आहे ना...???मग त्यांना अशा महत्त्वाच्या गोष्टी घेण्याइतपत पैसे नसतील तर त्यांना त्या दिल्या जातात. त्यांना त्याची गरज असते आणि त्या घेणं शक्य नसतं म्हणून...." निर्मला जमेल त्या शब्दात सांगत होती.
मग तिने पुढचा प्रश्न,"मग तसं असेल तर अर्चनाला का सगळी पुस्तके, वह्या,कपडे मिळाले?तिच्याकडे तर माझ्याहूनही चांगलं दप्तर आहे, गणवेशही. ती तर म्हणते तिचे बाबा डॉक्टर आहेत. मग तिला काय गरज आहे?"
या प्रश्नाचं मात्र उत्तर निर्मलाकडे नव्हतं. आई बराच वेळ उत्तर देत नाहीये म्हटल्यावर तिने पुढचा प्रश्न विचारला होता... "आई, हे बीसी म्हणजे काय गं?"......
-अनामिका.