जेमतेम बावन्न पत्त्यांची ही एकत्रित कुटुंबे. चार वर्णाच्या, विविध आवडीनिवडीच्या पत्त्यांनी थाटलेला त्यांचा संसार. इस्पिक, किल्विर, बदाम आणि चौकटच्या गोतावळ्यात वेगळवेगळे पत्ते, त्यांचा त्याप्रमाणे मानही वेगळा. तस म्हटल तर राजाराणीचा सुखी संसार इथेही आहेच की ! गुलामाला राजकुमार म्हटले की झाले. राजाराणीचा हा संसार वरवर त्यांचा असला तरी त्याचा कर्ताकरविता असतो दुसराच कुणी हुकमाचा एक्का. त्याच्या एका हुकुमासरशी डावच्या डाव कोसळून पडतात. एरवी उभे असणाऱ्या पत्त्यांना डाव सुरु झाला की एकमेकात मिळून वागण्याचा सल्ला देत, कुणीतरी पिसून काढतो. फर्रकन चित केल्यागत आडव पाडतो आणि पुन्हा उचलून हातात घेतो,' पाहू तरी काय करताय ?'अशा थाटात!
एकमेकात बावरलेले पत्ते जरा भानावर येऊ लागतात तोच नवी खेळी सुरु होते आणि त्यांच्यातील कोणीतरी दुसऱ्याच घरी जाते. जसा डाव तसे मानपान बदलत जातात. अशा बदलांची सवय करत पत्ते पुन्हा पुन्हा संसाराची स्वप्न पहात असतात. मोडलेल्या डावातून सावरत असतात.
कधी राजाची सरशी होते तर कधी राजकुमाराची. तर कधी आपल्या डोळ्यासमोर राणीला दुसऱ्याघरी जाताना पाहुनही राजा काहीच करू शकत नाही असेही क्रृर खेळ जगात घडतात. सगळे पत्ते आपले हुकुमाचे ताबेदार. कुणी कधी चित्रांचा संसार थाटला, एकीचा डाव मांडला तरच त्यांना जवळ येण्याची संधी.
लहर बदलली तर कुणाच्या रागाने झटक्यात सगळे पत्ते इतस्ततः भिरकावले जातात. तर कधी कठोरपणे दुमडले जातात.. उरलेल्या पत्त्यांना ते पहातांना काय वाटत असेल ? पत्त्यांचा बंगला वाऱ्याच्या फटक्याने कोसळतो तेव्हाचे काय विचारता?
असे हे पत्ते माझ्यासमोर येतात तेच मुळी कित्येक प्रश्न घेऊन. तासन् तास ह्या पत्त्यांमध्ये जीव रमतो असे काय आहे बरे त्यात? मी पैसे लावून जुगार खेळणाऱ्यांची किंवा तीन पानी रमी लावणाऱ्यांची गोष्ट करत नाहीये. साधे एका रंगावर त्याच रंगाचे पान लावण्याचा पहिला खेळ आठवा, अगदी बालपणी शिकलेला...हरता हरता जिंकण्याकरता किती डाव होतात? आणि मग रागावून पत्ते भिरकावून दिलेले आठवतात का तुम्हाला? शिवाय ताई दादा आईशी घेतलेली कट्टी? मला अजूनही नव्या पत्त्याचा कॅट काढताना त्याला येणारा तो एक विशिष्ट वास नाकात दरवळतो आहे असे जाणवते. त्या कोऱ्या करकरत पानांना पिसतांना जो आवाज येतो ते आजही कानात घर करून राहिला आहे.
वय वाढत जात तसे पत्ते खेळणे विविध रूपात समोर येत असत. कधी तिच्याकरता मुद्दाम चुकीच्या पत्याची चाल केली असते तर कधी त्याच्याकरता त्याला हवे ते पान खाली टाकणे..असे सारेच काही पानापानात दडलेले. तू तू मी मी आणि जगण्याच्या अनेक तऱ्हा आपल्याला पत्तेच नकळत शिकवून जातात.
'इथे पत्ते खेळू नये 'असा नियम मी तरी वाचला नाही. गच्चीवर, गादीवर, फरशीवर, ओट्यावर, बागेत , एवढेच काय लोकलमध्ये,गाडीत ,बसमध्ये आपल्याबरोबर सगळीकडे पत्त्यांची यात्रा निघते. लहानपणी वर्गात शिक्षक शिकवत असतांना अगदी पहिल्या बाकावर गप्पा आणि गाण्यांच्या सारखीच पत्त्यांची मैत्री अशावेळी मदतीला धावून येते. कंटाळवाण्या प्रवासाचा मागमूसही राहत नाही. प्रत्येक माणसाची मानसिकता किंवा त्याची जडणघडण म्हणे त्याच्या पत्ते खेळण्याच्या पद्धतीवरून समजते. तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का?
पत्त्यांचा खेळ वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या देशात खेळला जातो. वेगवेगळ्या भाषेत फक्त वेगळ नाव. पण पत्ते खेळणारी माणस सहज दिसतात. पत्त्यांच्या जादूची गोष्ट कुणी विसरेल का? नेमक समोरच्याच्या मनातल पान ओळखणं .... लहानपणी तर हे सर्वच भारलेल वाटत. वय वाढत जात आणि काहींचा पत्याचा छंद व्यसन होत तर काहींचा विरंगुळाच राहतो. दिवसेन दिवस एकटेच आपल्या पलंगावर पेन्शनचा डाव लावणारे आजी आजोबा तुमच्याही आठवणीत असतील. उद्या आपणही तसे होऊ.. कुणास ठाऊक..!
पत्यात असे रममाण होताना आपल्या चालींचे पत्ते मोहरे होत जातात आणि आपण? एरवी नियतीच्या हातातले खेळणे असलो तरी हातात योग्य पत्ते असले तेव्हा हुकुमाचे बादशहा! अशा औंटघटकेच्या खेळातच मन रमत जात. कधी कधी वास्तवापासून पळण्याचा तोच एक मार्ग शिल्लक राहतो !