मुंबईमध्ये ऑर्थोपेडिक सेवा हवी आहे

मुंबईमध्ये ऑर्थोपेडिक आरोग्यसेवा कुठे चांगली मिळू शकेल? यासंदर्भात कोणी माहितीची/चा डॉक्टर असल्यास माहिती सांगावी, ही विनंती. माझ्या बाबांच्या तब्ब्येतीचा प्रश्न आहे म्हणून मला एक अगदी क्लिअर आणि सहृदय प्रोफेशनल ओपिनिअन हवं आहे. गरजेची तपासणी आणि उपाययोजना देखील करून घ्यायची आहे जेणेकरून बाबांना लवकरात लवकर आराम होईल आणि त्यांची आता उरलेली उणीपुरी मोबिलिटी जास्तीतजास्त दिवस टिकवून ठेवता येईल.

मला वैद्यकीय क्षेत्रातलं जास्त काही माहिती नाही त्यामुळे मी कदाचित अपेक्षित माहिती देऊ शकत नाही पण मला कळलेली माहिती ही -

बाबांना लहानपणापासून ( ६०% ) पोलिओ झालेला आहे आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम त्यांच्या उजव्या पायावर झालेला आहे. त्या पायाची गुडघ्यातली वाटी फुटलेली आहे आणि रक्तपुरवठा देखील तितकासा नीटपणे होत नाही त्या पायाला ज्यामुळे त्या पायाला सेन्सेशन अगदी नसल्यातच जमा आहे. डावा पाय चांगला आहे आणि ज्याच्या जोरावर बाबा चालू शकतात ( लहानपणी मैलोनमैल चाललेले आहेत बाबा कशाचाही आधार न घेता आणि अर्थातच अनवाणी ). चप्पल/बूट वापरायची चैन बाबांना कधी अनुभवता आली नाही कारण त्यांचे पाय तेवढा भार (!!!) सहन करून त्यांना चालू देत नाहीत. ढिगभर जबाबदाऱ्यांमुळे स्वतःच्या तब्ब्येतीची कधी काळजी घेणे बाबांना सुधरले नाही आणि ज्यामुळे पायाची परिस्थिती बरीच बिघडली असावी ( हा माझा कयास आहे ). आता परिस्थिती अशी आहे की बाबा जे काही घरातल्या घरात किंवा बाहेर गेल्यावरही अतिआवश्यक इतकं जे जुजबी चालत आहेत ( काठी अथवा आमच्या कोणापैकी कोणी सोबत असल्यास त्याच्या हाताचा अथवा भिंतीचा आधार ) त्याचाही त्यांच्या चांगल्या पायावर ताण पडतो आहे आणि त्या पायाच्या पावलापासून ते कंबरेपर्यंत काही ना काही खूप दुखत असतं ( सद्ध्या कंबर दुखते आहे ज्यामुळे त्यांना साधं बसतासुद्धा येत नाहीये. यावेळेस बाबा स्वतःहून डॉक्टरकडे जाऊन आलेत, हे ऐकूनच माझं धाबं दणाणलं आहे.  ).

यावर स्थानिक ऑर्थोपेडिक डॉक्टरने सांगितले आहे की कॅलिपर बसवावे लागेल. या प्रश्नाबद्दल आईने खूप चौकशी केली होती ज्याबद्दल माझ्याकडे काही कागदपत्रे तर नाहीत पण ती म्हणाली की ऑपरेशन केले असते तर ५०-५० चान्स होता. ऑपरेशन यशस्वी झाले असते तर पाय पूर्ण बरा झाला असता आणि नसते झाले तर तेव्हा ते जितकं चालू शकत होते तेही बंद झालं असतं. याबद्दल अर्थातच आईबाबांनी काही चान्स घ्यायचा नाही असा निर्णय घेतला होता.  

या प्रश्नावर ठोस उपाय काय? बाबा किती दिवस चालत राहू शकतील? मोबिलिटी थांबली तर त्यांचा स्वभाव चिडचिडा होऊन जाईल कारण त्यांना डिपेंडन्सी अजिबात आवडत नाही.  

कृपया कोणी मदत करू शकत असल्यास लवकरात लवकर कळवावे. वाट पहाते आहे.

- वेदश्री.